‘हायकमांड’ उगाच म्हणत नाहीत…; गेहलोतांच्या सगळचं आलं अंगलट

| Updated on: Sep 26, 2022 | 4:04 PM

अशोक गेहलोतांचे नाव काँग्रेस अध्यक्ष पदासाठी चर्चेत आले असले तरी आता नेत्यानीच त्यांच्या निवडीवर खो घातला आहे, आणि थेट सोनिया गांधींकडे तक्रारही केली आहे.

हायकमांड उगाच म्हणत नाहीत...; गेहलोतांच्या सगळचं आलं अंगलट
Follow us on

जयपूरः काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक (Congress President Election 2022 ) होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेसमधील शशी थरुर, दिग्विजय सिंह यांच्याबरोबर अशोक गेहलोत (CM Ashok Gehlot) यांनीही या शर्यतीत उडी घेतली आणि सगळ्यात पुढेही निघून गेले. पक्षाध्यक्ष आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री पदाच्या वादामुळे काँग्रेसअंतर्गतच जोरदार खळबळ उडाली आहे. अशोक गेहलोतांची पक्षाध्यक्ष पदावर निवड झाली तर मुख्यमंत्री कोण हा सवालही उपस्थित झाल्यानंतर जयपूरमध्ये राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला. जयपूरमधील काँग्रेसच्या बैठकीला गेहलोत गट गैरहजर राहिल्याने उलटसुलट चर्चेताल सुरुवात झाली.

त्यामुळेच दिल्लीपासून जयपूरपर्यंत राजकीय उलथापालथ होत असताना काँग्रेस समितीकडून सोनिया गांधींना अनुशासन भंग प्रकरणी राजस्थानातील पक्षावर कठोर कारवाई करण्याची शिफारस केली.

सोनिया गांधी यांच्याकडे कारवाईची मागणी करण्यात आल्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पक्षाध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर काढण्याची मागणी काँग्रेस कार्यकारिणीने केली आहे. तसेच सोनिया गांधींना पक्षप्रमुखपदासाठी दुसरा उमेदवार निवडण्याचीही मागणीही त्यांनी केली आहे.

राजस्थान मुख्यमंत्री पदाचा गोळ वाढल्यानंतर मात्र गेहलोत गटातील आमदारांच्या वागणुकीमुळे संतप्त झालेल्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्यांनी त्यांच्याविरोधात पक्षप्रमुखांकडे तक्रार केली.

जयपूरमधील कालच्या झालेल्या स्वतंत्र बैठकीमुळे त्यांच्यावर विश्वास ठेवणे योग्य होणार नाही असंही पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने त्यांच्या उमेदवारीचा फेरविचार करावा.

ज्या नेत्यांनी सोनिया गांधींकडे तक्रार केली आहे त्यांनीच ज्येष्ठ नेते आणि गांधी कुटुंबाशी एकनिष्ठ असलेल्या व्यक्तीला उमेदवारी देण्याची विनंतीही केली गेली आहे.

राजस्थान मुख्यमंत्री पदाच्या निवडीसाठी बोलवण्यात आलेल्या काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी पक्षाचे निरीक्षक मल्लिकार्जुन खर्गे आणि अजय माकन उपस्थित होते.

मात्र जयपूरमधील बैठक फिसकटल्यानंतर आता खर्गे आणि माकन दिल्लीत जाऊन सोनिया गांधींना हा अहवाल सादर करणार आहेत.

काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीला राजस्थानातील काँग्रेसचे अनेक आमदार आले नसल्याने याबद्दल अनुशासनहीनता म्हटले गेले आहे. त्यामुळे बैठकील अनुपस्थित असलेल्या आमदारांवर कारवाई होणार की नाही ते पाहावे लागेलच असं माकन यांनी सांगितले.

जयपूरमध्ये रविवारी रात्री काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी होणार होती, मात्र त्याआधी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निष्ठावंत समजल्या जाणाऱ्या आमदारांनी वेगळीच बैठक घेतली.

संसदीय कामकाज मंत्री शांती धारिवाल यांच्या बंगल्यावर या आमदारांनी बैठक घेतली, त्यामुळे या बैठकीला अनुशासनहीनताही म्हटले गेले आहे. सभापती डॉ. सी. पी. जोशी यांची भेट घेतली.