नवी दिल्लीः राजस्थानमधील काँग्रेसच्या (Congress) अंतर्गत राजकारणाने आता परमोच्च टोक गाठले आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्यास नकार दिल्यामुळे पुन्हा एकदा सचिन पायलट (Sachin Pilot) यांचे स्वप्ने धुळीस मिळाली आहेत. काँग्रेस अध्यक्ष निवड होईपर्यंत आणि अध्यक्षपदाची नामांकन प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचेच निर्णय घेतले जाणार आहेत. त्यामुळे आता सोनिया गांधी काय निर्णय देतात याकडे साऱ्या नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
अशोक गेहलोत यांच्यामुळे काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनाही पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडले आहे. या राजकीय खेळीमुळे आता काँग्रेसनेही ‘प्लॅन बी’ तयार करायला हवा होता असं मत व्यक्त केले जात आहे. तर दुसरीकडे अशोक गेहलोत यांनाच अध्यक्ष करण्याची रणनिती वरिष्ठ नेत्यांची होती का असा सवालही उपस्थित केला जात आहे.
केवळ अशोक गेहलोतच नाही तर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही पदावरुन बाजूला होण्यास नकार दिला होता.
आता काँग्रेसला केवळ मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खर्गे आणि कुमारी सेलजा या नेत्यांनीच पाठिंबा दर्शवला आहे. आता काँग्रेसची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत काल एक दिवसाआधीपर्यंत काँग्रेसचे भविष्य होते मात्र एका दिवसात हे सगळेच चित्र पालटले.
त्यांचे नाव मागे पडताच हरियाणा काँग्रेसच्या अध्यक्षा कुमारी सेलजा याही पक्षाची कमान सांभाळू शकतात, असाही दावा करण्यात येऊ लागला आहे. तर दुसरीकडे राहुल गांधींची पहिली पसंदी ही के. सी. वेणुगोपाल असल्याचाही दावा केला जात आहे.
अशोक गेहलोत गटाचे काँग्रेसचे नेते शांती कुमार धारिवाल यांनी थेट अजय माकन यांच्यावर अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. तर सचिन पायलट यांना मुख्यमंत्री बनवसाठी हे नेते प्रयत्न करत असल्याचा आरोप केला जात आहे.
अशोक गेहलोत यांच्या समर्थनार्थ 80 हून अधिक आमदारांनी सचिन पायलटच्या नियुक्तीला विरोध केल्याचे म्हटले आहे. अशोक गेहलोत यांच्या विरोधात सचिन पायलटनी यापूर्वीच आपली ताकद दाखवून दिली आहे.
1. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या गटातील आमदारांनी उघड-उघड बंडखोरी केली. त्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी पक्षनिरीक्षक मल्लिकार्जुन खर्गे आणि अजय माकन यांच्याकडून राजस्थानमधील बंडखोरांचा लेखी अहवाल मागवला आहे. त्यामुळे गेहलोत अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाजूला मागे पडले आहेत.
2. मल्लिकार्जुन खरगे आणि अजय माकन यांनी दिल्लीला गेल्यानंतर अजय माकन यांच्यावर सचिन पायलट यांना मुख्यमंत्री पदासाठी ते लॉबिंग करत असल्याचा आरोप केला गेला. महेश जोशी आणि शांती धारिवाल यांची भूमिका पक्षनिरीक्षकांना पसंद पडली नसल्याने या नेत्यांवर करावाई करण्याची इच्छाही व्यक्त केली गेली.
3. सचिन पायलट यांच्या विरोधात काँग्रेस हायकमांडवर दबाव आणण्यासाठी गेहलोत गटाच्या आमदारांनी राजीनामा अस्त्रं बाहेर काढले. गेहलोत यांच्या समर्थकांना सचिन पायलट मुख्यमंत्री पद स्वीकारावे असं बिलकूल वाटत नाही.
4. अशोक गेहलोत यांच्या निकटवर्तीय शांती धारिवाल यांनी सोमवारी अजय माकन यांच्यावर सचिन पायलट यांच्यासाठी फिल्डींग लावल्याचा आरोप केला गेला आहे.
5. राजस्थानातील या राजकीय घडामोडींवर सोनिया गांधींबरोबर 1 तास बैठक होऊनही सीएलपीची बैठक झाली नसल्याने दुर्देवी म्हटले जात आहे. या बैठकीला के. सी. वेणुगोपालही उपस्थित होते. त्यांनीही बंडखोर आमदारांवर टीका केली आहे.
6. राजस्थान विधानसभेतील चीफ व्हीप सी. पी. जोशी यांनी म्हटले आहे की, कोणत्याही आमदाराला मुख्यमंत्री बनवण्यास कोणाचाही आक्षेप नाही. मात्र राजस्थानात तशी परिस्थितीच नाही.
7.अशोक गेहलोत यांना 82 आमदारांचा पाठिंबा असून या सर्व आमदारांनी पुढील रणनीतीवरही चर्चा केली आहे. 2020 च्या संकटात ज्यांनी काँग्रेस सरकारला साथ दिली त्यांनाच सत्ता देण्याची मागणी या आमदारांनी केली आहे. 2020 मध्ये सचिन पायलट यांच्यासह एकूण 18 आमदारांनी अशोक गेहलोत यांच्या विरोधात आवाज उठवला होता. 200 विधानसभेच्या जागा असलेल्या राजस्थानमध्ये काँग्रेसचे एकूण 108 आमदार हे काँग्रेसचेच आहेत.
8. काँग्रेस अध्यक्षपदासाठी पवनकुमार बन्सल यांनीही उमेदवारी अर्ज घेतला आहे. तो दाखल केला की नाही, याबाबत अजूनही स्पष्टता नाही. केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाकडून आतापर्यंत केवळ शशी थरूर आणि पवन बन्सल यांनीच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
9. आता अशोक गेहलोत यांच्यासमोर फारच थोडे पर्याय राहिले आहेत. त्यामुळेच काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून त्यांनी माघार घेतली असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्यासमोर राजस्थानचे मुख्यमंत्री राहण्याचाच पर्याय आहे.
10. भारतीय जनता पक्षाने राजस्थानातील राजकीय घडामोडींवर मात्र वेट अँड वॉच असाच पवित्रा घेतला आहे. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासाठी भाजपचे दरवाजे खुले असून त्यांना जर मुख्यमंत्री पद नाही मिळाले तर मात्र ते काँग्रेसविरोधात बंड करण्याच्या तयारीत असल्याचेही सांगण्यात येत आहे.