राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये राजपार्क हा सर्वात पॉश परिसर म्हणून ओळखल्या जातो. या भागात एका 5 स्टार हॉटेलमध्ये पोलिसांनी मध्यरात्री कारवाई केली. रात्री जवळपास दोन वाजता पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी यावेळी 16 मुली ,15 मुलांना आणि इतर जणांना अटक केली. जयपूर पोलीस आयुक्त बीजू जोजफ यांनी कारवाईचे आदेश दिले होते. रामाडा हॉटेलवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर लागलीच मुला-मुलींच्या पालकांना घटनास्थळी बोलावले. त्यावेळी त्यांना मोठा धक्का बसला.
पोलीस आयुक्तांची कडक कारवाई
पोलीस आयुक्तांनी जयपूर शहरातील सर्व दारुची दुकाने रात्री आठ वाजेपर्यंत बंद करण्याचे आदेश दिले होते. तर बार, डिस्को आणि पब रात्री 11 वाजेपर्यंत बंद करण्याचे आदेश दिले होते. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा आदेश दिला होता. काही दिवस बार, डिस्को, पब आणि दारु दुकानदारांनी आदेशाचे पालन केले. अशात त्यांनी आदेश धाब्यावर बसवले होते. याची कुणकुण लागतच पोलीस आयुक्तांनी कडक कारवाईचा आदेश दिला.
15 पोलीस ठाण्यांची एकत्र कारवाई
राजपार्कमधील रामाडा हॉटेलमधील पब आणि डिस्को मध्यरात्रीपर्यंत सुरु असतो, अशी खबर पोलिसांना मिळाली होती. पोलिसांच्या खबऱ्याने याविषयीची माहिती दिली होती. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी आदर्शनगर पोलीस ठाण्यासह आजुबाजूच्या 15 पोलीस ठाण्यांना त्याठिकाणी छापा मारण्यास सांगितले होते. त्यानुसार, या हॉटेलवर मध्यरात्री पोलिसांनी कारवाई केली. तेव्हा त्यांना मुलं-मुली आढळली.
नशेच्या धुंदीत मुलं-मुली
मध्यरात्री पोलिसांनी छापा मारला तेव्हा, रात्रीचे दोन वाजले होते. त्यावेळी मुलं आणि मुली नशेत होती. पोलिसांनी एक मोठी बस मागवली. या सर्वांना बसमध्ये बसवलं आणि पोलिस स्टेशनला आणलं. दरम्यान पोलिसांनी या सर्वांच्या आई-वडिलांना ठाण्यात बोलवले. त्यांना हा प्रताप दाखवला. त्यावेळी कुटुंबियांना मोठा धक्का बसला. या कारवाईमुळे अभ्यासाच्या नावाखाली रात्री पार्टीला जाणाऱ्या अनेक मुला-मुलींचे धाबे दणाणले आहे. तर बार मालकाविरोधात आता गुन्हा नोंदविण्यात आला आहे.