नवी दिल्लीः काँग्रेस वर्किंग कमिटीने (CWC) राजस्थानातील राजकारणाचा सोनिया गांधींना (Sonia Gandhi) अहवाल दिल्यावर काँग्रेसच्या राजकारणात प्रचंड मोठी खळबळ माजली. गेहलोत गट आणि पायलट गटाचे राजकारणही चव्हाट्यावर आले. त्यामुळे आता दिल्लीतील राजकारणही गेहलोत (CM Ashok Gehlot) आणि पायलट यांच्यामुळे ढवळून निघाले आहे. या धर्तीवरच सचिन पायलट प्रियंका गांधीला भेटणार असून अशोक गेहलोत यांनी सोनिया गांधींची भेट घेण्यासाठी वेळ मागितली आहे.
राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामाोडींबाबत आता दिल्लीत बैठकीवर बैठक होत आहेत. सचिन पायलट आज प्रियंका गांधी यांची भेट घेणार असून ही काँग्रेसचे नेते राजीव शुक्ला यांच्या घरी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे अशोक गेहलोतही आज दिल्लीत दाखल झाले आहेत.
सचिन पायलट यांना मुख्यमंत्री पदासाठी विरोध दर्शवण्यात आल्यानंतर ते मंगळवारपासून दिल्लीत ठाण मांडून आहेत. तर अशोक गेहलोतांनी दिल्ली वारी सुरुच ठेऊन ते आज सोनिया गांधींना भेटून काय सांगणार आणि सोनिया गांधी काय निर्णय घेणार याकडेच साऱ्या नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
राजस्थानमध्ये यापूर्वी जयपूरमध्ये मंत्री शांती धारिवाल यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती.
पक्षाने ज्या नेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती, त्यामध्ये शांती धारिवाल यांचाही समावेश आहे. धारिवाल यांनीच गेहलोत समर्थक आमदारांची आपल्या घरी बैठक बोलवली होती.
पक्ष निरीक्षक अजय माकन आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी दिलेल्या अहवालानुसार अशोक गेहलोत यांना क्लीन चिट मिळाली आहे.
मात्र ते अजूनही काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचेच सांगण्यात येत आहे. तर काँग्रेसच्या काही नेत्यांनी अध्यक्ष पदाच्या शर्यतीतून त्यांचे नाव वगळण्याची मागणी केली आहे.
तर सोनिया गांधींनीही काल त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे गेहलोतांबाबत पक्ष काय निर्णय घेणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
मुख्यमंत्री बदलच्या चर्चेनंतर राजस्थानमध्ये प्रचंड मोठी खळबळ उडाली असून गेहलोत यांना पाठिंबा देणाऱ्या 82 आमदारांनी आपले राजीनामे सभापतींकडे सुपूर्द केल्याचेही सांगण्यात येत आहे.
जोपर्यंत गेहलोत काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 19 ऑक्टोबरची निवडणूक होत नाही तोपर्यंत राज्यात मुख्यमंत्री बदलू नये अशी मागणी या आमदारांनी केली आहे.