जयपूरः मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) विमान दुर्घटनेची (Plane Crash) माहिती उघड झाली असतानाच आणखी एका विमान दुर्घटनेची बातमी धडकली आहे. ही घटना राजस्थानची (Rajasthan) आहे. हवेत उड्डाण घेताच एका चार्टर्ड प्लेनने पेट घेतला. या विमानात आगीचा भडका झाला आणि ते थेट जमिनीवर कोसळले. कोसळलेल्या विमानातून मोठमोठाले आगीचे लोळ निघत असून धूरही आहे. त्यामुळे अपघात स्थळी नेमके किती जण जखमी अथवा अपघातग्रस्त झालेत, याची अद्याप माहिती मिळालेली नाही. मध्य प्रदेशातही काही वेळापूर्वीच दोन विमानांची हवेतच धडक झाल्याचं वृत्त समोर आलं. त्यानंतर आता राजस्थानची बातमी हाती आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील आग्रा येथून या विमानाने उड्डाण घेतलं होतं. राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील उच्छैन परिसरात हे दुर्घटनाग्रस्त विमान कोसळलं.
आगरा येथून उड्डाण घेताच काही अंतरावर गेल्यानंतर विमानाने पेट घेतला. उच्छैन येथे आगीच्या ज्वालांमध्ये वेढलेलं हे विमान कोसलं. सुदैवाने विमान कोसळलं, त्या ठिकाणी नागरी वसती नाही.
भरतपूरचे जिल्हाधिकारी आलोक रंजन यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, या विमानातील पायलटने स्वतःला इजेक्ट केलं होतं. मात्र त्याचा अद्याप पत्ता लागलेला नाही. बचाव पथक पायलटचा शोध घेत आहे. एअरफोर्सचे अधिकारी आणि ग्रामीण भागातील नागरिक या बचाव कार्यात सहभागी आहे.
#WATCH | Rajasthan, Bharatpur | Wreckage of jet seen. Earlier report as confirmed by Bharatpur District Collector Alok Ranjan said charter jet, however, defence sources confirm IAF jets have crashed in the vicinity. Therefore, more details awaited. pic.twitter.com/005oPmUp6Z
— ANI (@ANI) January 28, 2023
या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आलाय. विमान कोसळल्यानंतर आगीच्या भडक्याने त्यातून धुराचे लोट निघत होते. विमानाचा काही भाग जळून खाक झालेला दिसून येतोय.
तर मध्य प्रदेशात मुरैना जिल्ह्यात सुखोई आणि मिराज या दोन विमानांची आकाशात धडक झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. मुरैना येथे ही विमानं कोसळली. सुदैवाने या घटनेत दोन पायलट बचावले तर एका पायलटचा शोध सुरु आहे. सुखोई-३० आणि मिराज २००० या दोन विमानांची धडक झाली. दोन्ही विमानांनी ग्वाल्हेर एअरबेसमधून उड्डाण केलं होतं.