Game Zone कसला हा तर मृत्यूचा खेळ, 28 जणांचा बळी, राजकोट अग्निकांडाची Inside Story

| Updated on: May 26, 2024 | 9:16 AM

Rajkot Gaming Zone Fire : राजकोटमधील गेमिंग झोनमध्ये आगडोंब उसळला. त्यात 28 लोकांचा मृत्य ओढावला. यामध्ये लहान मुलांचा समावेश आहे. अनेक लोक होरपळले आहेत. TRP गेमझोनला अग्निशमन दलाने NOC दिली होती का, असा सवाल विचारण्यात येत आहे.

Game Zone कसला हा तर मृत्यूचा खेळ, 28 जणांचा बळी, राजकोट अग्निकांडाची Inside Story
राजकोट गेमिंग झोन अग्नितांडव, एसआयटी चौकशी
Follow us on

गुजरातमधील TRP गेमझोनला भीषण आग लागली. या आगीत आतापर्यंत 28 लोकांचा मृत्य झाला आहे. यामध्ये लहान मुलांचा समावेश आहे. गुजरातमधील राजकोटमध्ये शनिवारी हा आगडोंब उसळला होता. यामध्ये 28 लोकांचा मृत्यू झाला, यामध्ये 12 लहान मुलांचा बळी गेला. रात्री उशीरापर्यंत अग्निशमन दलाचे पथक आग विझविण्याचे काम करत होती. अधिकाऱ्यांनुसार, आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे.

तपासासाठी SIT

या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने पाच सदस्यांची विशेष चौकशी समिती (SIT) स्थापन केली आहे. या दुर्घटनेत अनेकांचे मृतदेह पूर्णपणे होरपळले आहेत. काहींचे जळाले आहेत. त्यामुळे त्यांची ओळख पटविणे अवघड होत असल्याचे सहायक पोलीस आयुक्त (ASP) राधिका भराई यांनी सांगितले. राज्य सरकार या प्रकरणात मृतकांच्या कुटुंबियांना 4 लाख रुपये आणि गंभीर जखमींना 50 हजार रुपयांची भरपाई देणार आहे.

हे सुद्धा वाचा

1 किमीपर्यंत धुराचे लोट

या गेमझोनमधून वाचलेल्या एकाने घटनेची माहिती दिली. त्याच्या मते, टीआरपी गेमझोनमध्ये सर्व काही सुरळीत सुरु होते. लहान मुले खेळ खेळण्यात दंग होते. पालकही त्यांच्या आजुबाजूलाच होते. पण अचानक मोठा स्फोट झाला. काही समजण्यापूर्वीच आगीने रौद्ररुप धारण केले. आग सर्वदूर पोहचली. धुराचे लोट एक किलोमीटरपर्यंत दिसू लागले.

स्फोटाचे कारण तरी काय?

उन्हाचा त्रास जाणवू नये यासाठी या गेमझोनमध्ये एसी बसविण्यात आले होते. शॉर्टसर्किटमुळे एका एसीचा स्फोट झाला. त्यानंतर आग भडकली. गेमझोनमधील फॅब्रिकेशन, पडदे, प्लास्टिक आणि इतर वस्तू यामुळे आग झपाट्याने वाढली. या घटनेत आतापर्यत 28 जणांचा बळी गेला.

गेमझोनचे चार मालक

स्थानिकांच्या मते, या गेमझोनचे चार मालक आहेत. युवराज सिंह सोलंकी, प्रकाश जैन, राहुल राठोड आणि महेंद्र सिंह सोलंकी अशी त्यांची नावं आहेत. पोलिसांनी त्यातील युवराज सिंह सोलंकी याला ताब्यात घेतले आहे. मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यांची डीएनए तपासणी करण्यात येणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

स्फोटाप्रकरणी अनेक सवाल

या स्फोटाप्रकरणी अनेक प्रश्न समोर आले आहेत. पोलीस प्रशासन, नगर परिषद आणि अग्निशमन विभाग हे कटघऱ्यात आहेत. TRP गेमझोनला ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले होते का, हा सवाल विचारण्यात येत आहे. या गेमझोनमध्ये अग्निरोधक यंत्रणा बसविण्यात आली होती का, हा पण प्रश्न विचारण्यात येत आहे.

घटनेच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेनंतर राजकोट पोलीस आयुक्तांनी, शहरातील सर्व गेमझोन तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पण या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.