Azam Khan : सपाचे नेते आजम खान यांना 7 वर्षांचा तुरुंगवास; अख्खं कुटुंब जेलमध्ये, काय कारण?

| Updated on: Oct 18, 2023 | 4:15 PM

SP Leader Azam Khan Abdulla Azam Tanjim Fatima in Arrest : सपाचे नेते आजम खान यांना 7 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसंच त्यांच्या पत्नी तंजीम फातिमा आणि आजम खान यांचा मुलगा अब्दुल्ला आझम या तिघांना सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? वाचा...

Azam Khan : सपाचे नेते आजम खान यांना 7 वर्षांचा तुरुंगवास; अख्खं कुटुंब जेलमध्ये, काय कारण?
Follow us on

रामपूर | 18 ऑक्टोबर 2023 : उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आणि सपाचे नेते वरिष्ठ नेते आजम खान यांना न्यायलायाने मोठा धक्का दिला आहे. आजम खान यांना 7 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. रामपूरच्या (एमपी- एमएलए) न्यायलयाने ही शिक्षा सुनावली आहे. इतकंच नव्हे तर आजम खान यांच्या पत्नी तंजीम फातिमा आणि आजम खान यांचा मुलगा अब्दुल्ला आझम या तिघांना प्रत्येकी सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोर्टाच्या सुनावणीनंतर या तिघांची रवानगी थेट तुरुंगात होणार आहे.

बनावट जन्म दाखल्याशी संबंधित प्रकरणात या तिघांनावर कारवाई झाली आहे. त्यांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भाजपचे नेते आकाश सक्सेना यांनी 2019 मध्ये आजम खान यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. गंज या पोलीस स्टेशनमध्ये आजम खान यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात आजम खान यांच्या पत्नी आणि मुलगाही दोषी आढळला. या तिघांना आता रामपूर न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.

अब्दुल्ला आजम खान यांच्यावर बनावट जन्मदाखला बनवल्याचा आरोप आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी हे बनावट प्रमाणपत्र वापरल्याचा आरोप ठेवण्यात आला. अब्दुल्ला आजम हे रामपूर विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक लढवत होते. या निवडणुकीत त्यांचा विजयही झाला. पण निवडणुकीच्या निकालानंतर त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. अब्दुल्ला आजम यांनी या निवडणुकीवेळी जो जन्माचा दाखला जोडला आहे. तो बनावट आहे. निवडणूक लढण्यासाठी यात त्यांचं वय जास्त दाखवण्यात आलं आहे, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला.

2017 च्या निवडणुकीवेळी अब्दुल्ला आजम यांचं वय 25 वर्षे पूर्ण नव्हतं मात्र निवडणूक लढवण्यासाठी बनावट जन्म प्रमाणपत्र जोडण्यात आलं. तसंच त्याच्या आधारावर निवडणूक लढली गेली असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला.

शाळेतील कागदपत्रांवर अब्दुल्ला आजम यांची जन्मतारीख 1 जानेवारी 1993 आहे. तर जन्मदाखल्यावर 30 सप्टेंबर 1990 ही जन्मतारीख दाखवण्यात आली आहे. याच प्रमाणपत्राच्या आधारे अब्दुल्ला आजम यांनी निवडणूक लढली. यावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. आता याच प्रकरणी सात वर्षांची शिक्षाही झाली आहे.