नवी दिल्ली: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवाजी पार्कवरील सभेत हिंदुत्वाचा नारा दिला. या भाषणात राज यांनी भाजपवर टीका केली नाही. उलट भाजपच्या नेत्यांची स्तुती केली. त्यानंतर राज ठाकरे यांच्या भाषणाचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन केलं. या घडामोडी घडत असतानाच केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. या निमित्ताने मनसे-भाजप युतीच्या चर्चांना उधाण आलं. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी मोठं विधान केलं आहे. राज ठाकरे परप्रांतीयांच्या धोरणात बदल करत नाहीत, तोपर्यंत युती शक्य नाही, असं सांगतानाच मुंबई महापालिकेवर भाजपचीच सत्ता येणार असल्याचा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मीडियाशी बोलताना हा दावा केला आहे. राज ठाकरे यांच्या पाडवा मेळाव्यातील भाषणाचा अंदाज घेतला तर आम्हाला वाटत होतं शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, पण आता घरातूनच आवाज उठायला लागला आहे. राज ठाकरे हिंदुत्वाच्या दिशेने चालले आहेत. माझी आणि राज ठाकरे यांची भेट होणार आहे. पण वेगळ्या विषयावर भेट होणार आहे. ही भेट राजकीय असणार नाही, असं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं.
ईडी, सीबीआय या स्वायत्त संस्था आहेत. तक्रार आल्यावरच त्या कारवाई करतात. त्यामुळे ती कोणालाही लागू शकते. घाबरण्याचं त्यात काय कारण? असा सवालही त्यांनी केला.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यूपीएच्या अध्यक्षपदाबाबत रस नसल्याचं म्हटलं आहे. त्यावरूनही रावसाहेब दानवे यांनी टोले लगावले. यूपीएच्या अध्यक्षपदाबाबत पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. पण यूपीएच्या अध्यक्षपदाबाबत राष्ट्रवादीनेच ठराव केला आहे, याकडेही दानवे यांनी लक्ष वेधले.
भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी काल राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये बंददाराआड चर्चा झाली. दोन्ही नेत्यातील चर्चेचा तपशील समजू शकला नाही. मात्र भाजप-मनसे युतीबाबत या भेटीत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक कयास लगावले जात आहेत.
संबंधित बातम्या:
Maharashtra News Live Update : महाविकास आघाडीच्या आमदार खासदारांची शरद पवारांच्या घरी डिनर डिप्लोमसी