नवी दिल्ली : राज्यातील सत्तांतरानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर आता विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आलीय. राज्यातील सत्तापालटाला महिना उलटून गेला तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. यावरुन अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खोचक टीका करत आहेत. मात्र, त्याचवेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी अजित पवारांबाबत खळबळजनक वक्तव्य केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद कायम आहेत. पहाटेचा शपथविधी पाहिल्यानंतर आपल्याला कळलं असेल. अजित पवार आता पहिल्यासारखे कडवे राहिले नाहीत, असा मोठा दावा रावसाहेब दानवे यांनी केलाय.
रावसाहेब दानवे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद कायम आहेत. पहाटेचा शपथविधी पाहिल्यानंतर आपल्याला कळलं असेल. अजित पवार आता पहिल्यासारखे कडवे राहिले नाहीत. प्रत्येकाला आपला जीव वाचवायचा पडला आहे. त्यांना माहिती आहे ईडी आणि सीबीआय त्यांचं काम करत आहे, हे त्यांनाही कळलंय. इतकंच नाही तर राज्यात सगळ्यात मोठा पक्ष भाजप आहे. पुढच्या काळातही भाजपच सगळ्यात मोठा पक्ष राहील. आम्ही सगळ्यांना भूईसपाट करु. प्रत्येक पक्षाची काय स्थिती झाली राज्यात? असा सूचक प्रश्नही दानवेंनी केलाय.
दानवे यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवरही जोरदार हल्ला चढवलाय. हे आता म्हणत आहेत निष्ठेचं दूध पाजलं. यांनाही कुणीतरी निष्ठेचं दूध पाजलं होतं. बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन यांनी युती घडवून आणली. त्यावेळीच ठरलं होतं ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री. त्यावेळी शिवसेनेचे जास्त आमदार आले, तेव्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री केला. मग नंतर कुणाबरोबर गेले, तेव्हा का नाही निष्ठा आठवली, आताच का निष्ठा आठवली? असा सवाल दानवेंनी केलाय.
शिवसेनेचे खासदार, आमदार आम्हाला खासगीत सांगतात. परिवारवादी पक्ष आहे. राज्याचं किंवा जनतेचं हित यांना कळत नाही, फक्त परिवाराचं हित कळतं. प्रादेशिक पक्ष संपणार आहेत. शिवसेनेचीही तीच अवस्था होईल. तो काय राष्ट्रीय पक्ष आहे का? प्रादेशिक पक्षच आहे, असा दावाही दानवे यांनी केलाय. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यानंतर आता दानवेंच्या या दाव्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.