मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या डिग्रीवरून (Narendra Modi Degree) राजकारण तापलेलं असताना सोशल मीडियावर एक गाणं प्रचंड धुमाकूळ घालतंय. मेरे पास डिग्री तो… कसलं भी काम दो.. हे गाणं काही तरुणांनी तयार केलंय. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय. आमच्याकडे डिग्री आहे, कोणतंही काम द्या. रिकामा बसलाय एकटा… इथं जो तो चिडवाय लागलाय मला भुकटा… या ओळीचं हे गाणं तरुणांकडून वेगाने शेअर केलं जातंय. डिग्रीचा गणवेश परिधान केलेले, हाती डिग्री, बायोडाटा घेऊन तरुणांनी एका व्हिडिओद्वारे हे गाणं सादर केलंय. सुशिक्षित तरुणांकडे अनुभव, शिक्षणाची पदवी असतानाही त्यांच्या हाताला काम नाही. कुणीतरी काम द्या, अशा आशयाचं हे गाणं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच नाव न घेता टार्गेट केलं असल्याने आता या मुलांवर कारवाई व्हायला नको, असं सूचक ट्विट शिवसेना नेत्याने केलंय.
बस्सऽऽ या मुलांवर कारवाई झाली नाही पाहिजे #EDसरकार कडून…. pic.twitter.com/goAgGIEERW
हे सुद्धा वाचा— Ayodhya Poul – अयोध्या पौळ पाटील. (@PoulAyodhya) April 7, 2023
ठाकरे गटाच्या आक्रमक पदाधिकारी अयोध्या पौळ पाटील यांनी यासंदर्भात ट्विट केलंय. अयोध्या पौळ या ठाकरे समर्थित शिवसेनेच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक आहेत. या गाण्याचा व्हिडिओ पौळ यांनी ट्विट केला. तसेच आता ईडी सरकारकडून या मुलांवरही कारवाई झाली नाही पाहिजे, असा संदेश त्यांनी लिहिलाय…
राज्यातील, देशातील सामाजिक, राजकीय स्थितीवर रॅप साँगच्या माध्यमातून भाष्य करणारे व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवरून पन्नास खोक्यांची टीका होत असते. याच विषयावरून चोर आले पन्नास खोके घेऊन.. हे एक गाणं गेल्या काही दिवसांपासून प्रचंड लोकप्रिय झालं. मात्र शिंदे गटाच्या बंडखोरीवरचं गाणं करणं या रॅपरला महागात पडलंय.
राज मुंगासे या रॅपरविरोधात अंबरनाथ येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आता डिग्रीचं गाणं सादर करणाऱ्या मुलांवरही कारवाई तर होणार नाही, अशी भीती अयोध्या पौळ पाटील यांनी व्यक्त केली आहे..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री सार्वजनिक करण्याची मागणी आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी केली होती. ७ वर्षांपूर्वी तत्कालीन निवडणूक आयुक्तांनी ही मागणी मान्य करून गुजरात तसेच नवी दिल्ली विद्यापीठांना संबंधित आदेश दिले होते. मात्र गुजरात विद्यापीठाने गुजरात हायकोर्टात याविरोधात याचिका दाखल केली होती. हायकोर्टाने निवडणूक आयुक्तांचा हा आदेश रद्द ठरवत अरविंद केजरीवाल यांना २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. पंतप्रधानांची डिग्री सार्वजनिक करण्याची काही गरज नाही, असे आदेश दिले. भाजप विरोधी नेत्यांनी हा मुद्दा उचलून धरला असून देशाच्या पंतप्रधानांनी आपली डिग्री सार्वजनिक करण्यास हरकत काय, असा सवाल केलाय. याच मुद्द्यावरून सदर तरुणांनी तयार केलेलं गाणं सध्या लोकप्रिय झालंय.