गेल्या दोन दशकात भाजप केंद्रस्थानी आहे. आता तिसऱ्यांदा भाजपच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले आहे. नागपूर येथून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांचे व्यवस्थापन चालते. सध्या देशातील 99 टक्के जिल्ह्यांमध्ये शाखांचे जाळे विणले गेले आहेत. RSS च्या दाव्यानुसार, यावर्षी मार्च महिन्यापर्यंत संघाच्या देशात 73 हजार शाखा होत्या. पुढील वर्षापर्यंत शाखांची संख्या 1 लाख करण्याचे उद्दिष्ट आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी रांची येथील नामकुममध्ये आरएसएसच्या प्रांत-प्रचारकांची एक बैठक घेण्यात आली होती.
वर्ष 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर संघाचा विस्तार मोठ्या वेगाने झाला. गेल्या 10 वर्षांत संघाच्या शाखांचा विस्तार दुप्पट झाला आहे. असे काही पहिल्यांदा घडले नाही. यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात घडले होते. त्यावेळी संघाचा आलेख उंचावला होता.
1998 मध्ये देशभरात 30 हजार शाखा
वर्ष 1998 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार आले होते. त्यावेळी संघाच्या जवळपास 30 हजार शाखा देशभरात सुरु होत्या. त्यावेळी मध्यप्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात सर्वाधिक शाखा होत्या. अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार केंद्रात 6 वर्षे होते. वर्ष 2004 मध्ये अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक झाली. त्यावेळी संघाच्या शाखांविषयीची माहिती समोर आली होती. त्यानुसार, 1998 ते 2004 या वर्षांत संघाच्या शाखांची संख्या 9 हजारांनी वाढली.
2004 मध्ये संघाच्या जवळपास 39 हजार शाखा संपूर्ण देशभरात होत्या. त्यावेळी संघाने घोषणा केली होती की, पुढील पाच वर्षांत देशभरात संघाच्या शाखांची संख्या 50 हजारांचा आकडा पार करणार.
सरकार गेल्यानंतर संख्येत घट
पण वर्ष 2004 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार सत्तेबाहेर फेकले गेले. त्यानंतर देशात पुढील दहा वर्षे भाजप सत्ते बाहेर होती. 2013 मध्ये अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक झाली. त्यावेळी पुन्हा शाखांची माहिती समोर आली. त्यानुसार, 2013 मध्ये देशात 28,788 ठिकाणी आरएसएसच्या 42,981 च्या शाखा चालविण्यात येत होत्या. तर 9597 ठिकाणी साप्ताहिक बैठकी होत होत्या.
एकूण संख्येचा विचार करता, 2004 ते 2013 या वर्षादरम्यान संघाच्या शाखांमध्ये एकूण 3 हजारांची भर पडली होती. संघाने जे 50 हजार शाखांचे लक्ष्य ठेवले होते. ते या 10 वर्षांत काही पूर्ण करता आले नाही.
मोदी सरकारच्या काळात किती वाढली संख्या?
संघाकडून उपलब्ध माहितीनुसार, वर्ष 2019 मध्ये देशभरात संघाच्या एकूण 59 हजार शाखा सुरु होत्या. या दरम्यान संघाने 17,229 ठिकाणी कार्यकर्त्यांसाठी साप्ताहिक बैठकांचे आयोजन केले होते. 2013 च्या तुलनेत ही संख्या 17 हजारांनी वाढली होती. वर्ष 2023 मध्ये आरएसएसच्या 42,613 ठिकाणी 68,651 रोज शाखा भरत आहेत. तर 2024 मध्ये त्यात वाढ झाली आहे. या मार्च महिन्यापर्यंत देशभरात आरएसएसच्या 73 हजार शाखा सुरु आहेत. पुढील वर्षापर्यंत ही संख्या 1 लाख करण्याचे संघाचे नियोजन आहे.