नवी दिल्ली: मुंबईत धावणाऱ्या एसी लोकलमध्ये प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी एसी लोकलचे तिकीट दर सामान्य माणसाला परवडणारे करावे, अशी मागणी शिवसेना (Shiv sena) खासदारांनी आज संसदेत केली. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी आज लोकसभेत ही मागणी केली. रेल्वेच्या अनुदान मागण्यांसंदर्भात लोकसभेत बोलाताना त्यांनी ही मागणी केली. रेल्वेने रेल्वे जमिनीवर अनधिकृपणे राहणाऱ्या लाखो नागरिकांना घरे खाली करण्याच्या नोटिसा पाठवल्या होत्या. मुंबई-ठाण्यासह आसपासच्या परिसरात लाखो नागरिकांवर बेघर होण्याची टांगती तलवार होती. आज खासदार श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान जोपर्यंत या रहिवाशांच्या पुर्नवसनाचा मार्ग सुटत नाही तोपर्यंत कुठलीही कारवाई करु नये, अशी मागणी रेल्वे मंत्री तसेच रेल्वे राज्यमंत्री यांच्याकडे केली. नुकत्याच कार्यान्वित झालेल्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकांवरुन चालवण्यात येणाऱ्या एसी लोकल सेवेचे भाडे कमी करावे व नॉन एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात याव्यात अशी मागणीही श्रीकांत शिंदे यांनी केली.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज लोकसभेत रेल्वे संबंधित अनुदान मागणी संदर्भातील चर्चेत भाग घेतला. यावेळी त्यांनी ही मागणी केली. मुंबईसह मुंबई उपनरीय रेल्वे सेवांबाबत उदभवणाऱ्या समस्यांकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. मुंबईत पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवरून एसी लोकल चालवण्यात येत आहेत. या लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गेल्या दीड महिन्यातील आकडेवारी शिंदे यांनी सभागृहात सादर केली. एसी लोकलचे भाडे साधारण लोकलमधील सेकंड क्लासच्या तिकीटाच्या दहापट आहे. तसेच फर्स्ट क्लासपेक्षा दुप्पट आहेत. एवढे भाडे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना परवडणारे नाही. या लोकलचा दैनंदिन प्रवास करणाऱ्यांना काहीच फयदा होत नाही. एसी लोकलला गर्दी होत नसल्याने एसी रेल्वे सेवेचा खर्च रेल्वेला भारी पडत आहे. त्यामुळे या मार्गावरील सुरु केलेल्या एसी लोकल रेल्वे सेवेचे भाडे कमी करावे तसेच जास्तीत जास्त फेऱ्या या नॉन एसी लोकल रेल्वे सेवेच्या केल्या पाहिजेत. जेणे करुन याचा लाभ या मार्गावर दैनंदिन प्रवास करणाऱ्या लाखोंनी प्रवाशांना मिळेल, अशी मागणी शिंदे यांनी केली.
तसेच लोकमान्य टिळक टर्मिनसपर्यंत असलेल्या या पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकां छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत वाढवण्याचे काम लवकरात लवकर सुरु करावे, अशी मागणीही त्यांनी केली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर मुंबईसह देशभरातील रेल्वेच्या जमिनींवर अनधिकृतपणे राहत असलेल्या लाखो नागरिकांना रेल्वे प्रशासनाने या जमिनी तातडीने रिक्त करण्याच्या नोटीसा धाडण्यात आल्या आहेत. दोन दिवसापूर्वी पुन्हा रेल्वे प्रशासनाकडून या रहिवाशांना नोटीसा पाठवण्यात आल्या असल्याचे स्पष्ट करत जोपर्यंत या रहिवाशांच्या पुर्नवसनाचा मार्ग सुटत नाही, तोपर्यंत कुठलीही कारवाई करु नये, अशी मागणीही त्यांनी केली.
गेल्या वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या पनवेल- कर्जत मार्ग, चिखलोली रेल्वे स्थानकाचे धीम्या गतीने सुरू असलेले काम लवकर पूर्ण करा, दिवा – वसई मार्गावर रेल्वे सेवा वाढवण्यात याव्यात, कल्याण ते बदलापूर या पट्यात तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकांसाठी जमिन अधिग्रहणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी त्यांनी केली. कोकण रेल्वे मार्गावरील जास्तीत जास्त गाड्यांना दिवा रेल्वे स्थानकात थांबा द्यावा, सोलापूर – तुळजापूर – उस्मानाबाद या रेल्वे प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाचे काम खूपच संथ गतीने सुरु असून हे काम गतीने पूर्ण करत सोलापूर – तुळजापूर – उस्मानाबाद या रेल्वे मार्गिकांच्या प्रत्यक्ष कामाला देखील लवकरात लवकर सुरुवात करावी अशी मागणीही त्यांनी केली.
मुंबईत सुरू करण्यात आलेल्या एसी लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या आजमितीला खूपच कमी आहे. या मोजक्या प्रवाशांसाठी रेल्वे ला प्रसंगी तोटा पत्करून या एसी ट्रेन चालवाव्या लागताहेत. तसेच, एसी ट्रेन मुळे साध्या लोकल ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा होऊन फलाटावर गर्दी वाढते. यावर उपाय म्हणून रेल्वेने एसी लोकलचे तिकीट दर कमी केले तर प्रवाशांचा प्रतिसाद वाढेल आणि परिणामी रेल्वेचा तोटा देखील होणार नाही. तसेच अपघातग्रस्त प्रवाशांना तातडीने उपचार मिळण्यासाठी प्रत्येक रेल्वे स्थानकावर मोबाईल क्लिनिक सुरू करण्यात यावे, अशीही मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केली.
यासह लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी 500 ज्यादा कोचेसची व्यवस्था, प्लॅटफॉर्म ची उंची वाढविण्याचा कामाला गती द्यावी, दादर रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्पात फेरीवाले आणि पार्किंगची व्यवस्था करावी, पावसाळ्यातील परिस्थिती हाताळण्यासाठी रेल्वेने मुंबई महानगर पालिकेच्या ब्रिमस्टॉवड प्रकल्पाची डिझाईन घ्यावी यांसह अन्य विषयांवर खासदार शेवाळे यांनी सूचना केल्या.
Nana Patole : रश्मी शुक्लांच्या अडचणी वाढणार? 500 कोटींचा दावा ठोकणार, नाना पटोलेंचा इशारा
शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी तांत्रिक समितीची स्थापना; Nitin Raut यांची घोषणा