नवी दिल्ली | 23 नोव्हेंबर 2023 : राजस्थानमधील रणधुमाळी थोड्याच वेळात शांत होईल. दिवाळीपेक्षा ही या प्रचारात आरोप-प्रत्यारोपाचे बॉम्ब फुटले. आरोपांची राळ उडाली. शाब्दिक चकमकी उडाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक वक्तव्य चांगलेच गाजले. त्यांनी राजेश पायलट यांचा दाखल देत काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजस्थानमधील भीलवाडा येथील प्रचार सभेत बोलत होते. त्यांनी काँग्रेसवर जोरदार शाब्दिक प्रहार केला होता. त्यावर राजेश पायलट यांचा मुलगा सचिन पायलट यांनी आता प्रतिवार केला आहे.
काय म्हणाले पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचार सभेत काँग्रेसवर शाब्दिक बाण सोडले. ‘एक वेळा राजेश पायलट यांनी काँग्रेसच्या फायद्यासाठी, तिला आव्हान दिले होते. पण हा बदल काँग्रेसला रुचला नाही. त्याचीच शिक्षा आज ते पायलट यांच्या मुलाला देत असल्याचा आरोप त्यांनी केला’.
पंतप्रधानांच्या वक्तव्यात सत्यता नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वक्तव्याचा सचिन पायलट यांनी खरपूस समाचार घेतला आहे. पंतप्रधानांच्या वक्तव्यात सत्यता नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. दिवगंत राजेश पायलट हे इंदिरा गांधी यांच्यापासून प्रेरीत होऊन लोक सेवा करण्यासाठी काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. त्यांनी दीर्घकाळपर्यंत जनतेची सेवा केली. ते आयुष्यभर जातीयवादी शक्तींविरुद्ध लढले.
राजेश पायलट यांनी केले होते बंड
पंतप्रधानांनी भिलवाडा येथील सभेत जी आठवण सांगितली. ती 1997 मधील एका घटनेच्या आधारे सांगितली आहे. त्यावेळी काँग्रेसने अध्यक्ष पदाची निवडणूक घेतली होती. तेव्हा पक्षात सीताराम केसरी यांच्या शब्दाला मान होता. पण राजेश पायलट यांनी सीतामराम केसरी यांना या निवडणुकीत आव्हान दिले होते. पायलट यांना आपण निवडून येणार नाही, याचा अंदाज आला होता. पण त्यांनी निवडणूक लढवली. पण पुढे झाले ते सर्वांना माहिती आहे. यावरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निशाणा साधला.
माझी चिंता BJP ने करु नये
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या हल्ल्यानंतर त्याला सचिन पायलट यांनी उत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझ्या वर्तमान आणि भविष्याची चिंता करण्याची गरज नसल्याचा पलटवार त्यांनी केला. त्याची चिंता जनता आणि माझा पक्ष करेल, असे ते म्हणाले. राजस्थानमध्ये 25 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. पाच राज्यांची मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होईल.