मुंबई । 17 जुलै 2023 : गेली 117 वर्षांची परंपरा असलेली देशातील पहिली डबलडेकर फ्लाईंग राणी एक्सप्रेसचा कालपासून एलएचबी डब्याचा प्रवास सुरु झाला. रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश यांच्या हस्ते काल मुंबई सेंट्रलहून तिला रवाना करण्यात आले. मात्र, या गाडीचे दुमजली डबे काढल्याने सकाळी सुरत ते मुंबई या प्रवासात अनेक प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागला. यासंदर्भात प्रवाशांनी समाजमाध्यमावर फोटो शेअर करीत मासिक पासधारकांसाठी पुन्हा दुमजलीच डब्बे जोडण्यात यावेत अशी मागणी केली आहे.
सुरत ते मुंबई सेंट्रल ( ट्रेन क्र.12922 ) धावणारी फ्लाईंग राणी एक्सप्रेस 117 वर्षांची झाली आहे. ही गाडी 1906 रोजी सुरु झालेली 1939 वर्ल्ड वॉरमुळे अधून मधून बंद झाली. मुंबई ते पुणे डेक्कन क्वीनप्रमाणेच डायनिंग कारची सुविधा ( धावते उपहार गृह ) होती. यातीलही कटलेट, साबुदाणा वडा, ऑम्लेट प्रचंड प्रसिद्ध होते. नंतर ही डायनिंग कार हटविली गेली. 18 डिसेंबर 1979 पासून तिला नॉन एसी डबलडेकरचे डबे जोडण्यात आल्याने ती देशातील पहिली डबल डेकर बनली.
People suffering in new flying Rani, No enough place to stand and seat, Suggession to replace general coaches like MST with upper seating pic.twitter.com/7WK3aY4ilQ
— Searching Info (@luvlaugh55) July 17, 2023
मुंबई ते सुरत फ्लाईंग राणीचे डबल डेकरचे डबे बदलून तिला एलएचबीचे 21 डबे जोडण्यात आले आहेत. ही ट्रेन गेली चार दशके डबल डेकरच्या दहा आणि इतर सिंगल डब्यांद्वारे सेवा देत आहे. डेबल डेकर नॉन एसी डब्यांचे आर्युमान संपल्याने या गाडीला रविवारपासून काळानुरुप एलएचबी तंत्रज्ञानाचे 21 डबे लावण्यात आले आहेत. या गाडीच्या बदललेल्या स्वरुपामुळे तिची आसन क्षमता कमी झाली आहे. प्रत्येक एलएचबी डब्यांत श्रेणीनूसार 24 ते 102 प्रवासी सामावू शकतात. तर नॉन एसी डबल डेकरच्या एका डब्यांची क्षमता 136 प्रवासी इतकी आहे. त्यामुळे डबल डेकरमध्ये 33 टक्के जादा प्रवासी सामावतात.
2 एसी चेअर कार ( आरक्षित ), 7 सेंकड क्लास आरक्षित कोच, 7 अनारक्षित सेंकड क्लास सिटींग, 1 फर्स्टक्लास पासधारकांसाठी, 1 सेंकड क्लास पास धारकांसाठी, 1 कोच महिला पासधारकांसाठी, 1 अनारक्षित कोच महिला प्रवाशांसाठी असे एलएचबी तंत्रज्ञानाचे 21 डबे जोडण्यात आले आहेत.