न्यायाधिशांच्या घरात पैशांनी भरलेली खोली; रकमेचा आकडा पहिल्यांदाच समोर, वाचून बसेल धक्का

| Updated on: Mar 22, 2025 | 6:17 PM

न्याय‍ाधीश यशवंत वर्मा यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळून आली होती. त्यांच्या निवासस्थानी आग लागली होती, त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.

न्यायाधिशांच्या घरात पैशांनी भरलेली खोली; रकमेचा आकडा पहिल्यांदाच समोर, वाचून बसेल धक्का
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

न्याय‍ाधीश यशवंत वर्मा यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळून आली होती. त्यांच्या निवासस्थानी आग लागली होती, त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. ही घटना जेव्हा घडली तेव्हा न्यायाधीश यशवंत वर्मा आपल्या घरी नव्हते. त्यांच्या कुटुंबीयांनी घराला आग लागल्याची माहिती अग्नीशमन दल आणि पोलिसांना दिली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.यशवंत वर्मा यांच्या घराची एक संपूर्ण खोली कथितरित्या पैशांनी भरलेली असल्याचं समोर आलं. त्यानंतर त्यांची तातडीनं बदली देखील करण्यात आली आहे.

दरम्यान या प्रकरणात आता दिल्ली हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश डी के उपाध्याय यांनी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्याकडे एक रिपोर्ट सादर केला आहे. यशवंत वर्मा यांच्या घरात 15 कोटी रुपये रोकड मिळाल्याचं या रिपोर्टमधून समोर आलं आहे.दरम्यान या प्रकरणात पुरावे आणि माहिती गोळा करण्यासाठी आता अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अलाहाबाद हाय कोर्टाच्या बार असोसियशनचे अध्यक्ष अनिल तिवारी यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. जर एखाद्या सामान्य व्यक्तीच्या घरात पंधरा लाख रुपये सापडले तर त्याला जेलमध्ये टाकलं जातं. मात्र इथे न्यायाधिशांच्या घरात 15 कोटी रुपये आढळून आले आहेत. तर त्यांना मात्र घरवापसीचा इनाम मिळत असल्याचं अनिल तिवारी यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की आमची अशी मागणी आहे की, यशवंत वर्मा यांची बदली अलाहाबाद हाय कोर्टात करू नये, या प्रकरणात आता कोणतीही चौकशी करण्याची गरज नाही, कारण वर्मा यांनी यावर काहीही जरी स्पष्टीकरण दिलं तरी आता त्यांच्यावरील जनतेचा विश्वास उडालेला आहे. त्यामुळे पुन्हा तो विश्वास वापस येणार नाही, बदली ही त्यांची शिक्षा होऊ शकत नाही, त्यांच्याविरोधात महाभियोग चालवण्यात यावा अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे. दरम्यान त्यामुळे आता या प्रकरणात आता न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.