नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरात दंगलीवर प्रदर्शित झालेली बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीच्या वादावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मोठे विधान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताबाबत पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांकडून गेल्या काही दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून वाद आणि चर्चा सुरू करण्यात आल्या आहेत. त्याबाबत परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, ही वेळ अचानक आली नाही. सध्या भारतात निवडणुकीचा हंगाम सुरू झाला आहे की नाही माहीत नाही, पण लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये मात्र नक्कीच सुरू झाला आहे.
त्यामुळे ही डॉक्यमेंट्री म्हणजे राजकारणाचा भाग असून ही त्या लोकांची एक चाल असल्याची टीका त्यांनी यावेळी केली आहे. ज्यांना राजकीय क्षेत्रात उतरण्याची हिंमत नाही, त्यांनी हे उद्योग केल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
Do you think timing is accidental? Don’t know if election season has started in India, but for sure it has started in London&NY. This is politics at play by those who don’t have courage to come into political field: EAM Dr Jaishankar on some Western media narratives against India pic.twitter.com/A4h2LoUU4p
— ANI (@ANI) February 21, 2023
जयशंकर यांनी बीबीसी डॉक्युमेंट्रीविषयी बोलताना म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून अहवाल आणि दृश्यांमध्ये अचानक वाढ का झाली? या सारख्या घटना याआधी कधी घडल्या नाहीत का असा सवाल करून त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
1984 चा उल्लेख करत त्यांनी म्हटले आहे की, दिल्लीतही त्यावेळी खूप काही घडले होते, मग त्यावर का आपण डॉक्युमेंट्री बनवत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
या प्रकारामुळे मला आता वैयक्तिक असं वाटत आहे की, मी खूप मानवतावादी आहे आणि माझा विश्वास आहे की ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांना आता न्याय मिळाला पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितले.
बीबीसी डॉक्युमेंट्रीवरून जयशंकर यांनी सांगितले की, भारताचे राजकारण कधी कधी देशाच्या हद्दीतच येतेच असे नाही तर त्याचे पडसाद इतर ठिकाणी पडू शकतात.
आम्ही केवळ एखाद्या माहितीपटावर किंवा एखाद्या युरोपियन शहरात झालेल्या भाषणावर किंवा कुठेही वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या भाषणावर चर्चा करत नाही. तर हा राजकीय वाद प्रसारमाध्यमांद्वारे जागतिक पातळीवर मांडला जात आहे. त्यामुळे इतर माध्यमातून हा राजकारण करण्याचा हा प्रकार घडत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
या प्रकारे भारताची, सरकारची, भाजपची आणि पंतप्रधानांची अतिरेकी प्रतिमा कशी आकाराला येते हे आता साऱ्या देशाने पाहिले आहे. त्यामुळे या गोष्टी गेल्या दहा वर्षापासून सुरूच असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
त्यामुळे प्रसारमाध्यमांद्वारे चालवल्या जाणाऱ्या अशा अशा अजेंड्याला बळी पडू नका असं आवाहनही त्यांनी यावेळी केले.
राजकीय क्षेत्रात उतरण्याची हिंमत नसलेल्या लोकांकडूनच अशा प्रकारचे राजकारण केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे ते स्वत:ला एनजीओ किंवा माध्यमं असल्याचे सांगून असा अजेंडा राबवत असल्याचेही त्यांना म्हटले आहे.
परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी कोविडच्या काळातील आठवणी सांगत म्हटले की, तो काळ आमच्यासाठी कठीण काळ होता. त्या वाईट काळात एकीकडे लोकांचे जीव जात होते, तर त्यावेळी आम्ही मात्र नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होतो असंही त्यांनी यावेळी मोदी सरकारची बाजू मांडताना सांगितली.