नवी दिल्ली | 30 जुलै 2023 : पाकिस्तानातून प्रेमासाठी पळून आलेल्या सीमा हैदर आणि तिचा प्रियकर सचिन यांचे सध्या बुरे दिन सुरु झाले आहेत. सीमा आणि सचिन तसेच सचिनचे वडीलांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात पोलिस केसमुळे कोणीही कमविण्यासाठी घराबाहेर पडत नसल्याने उपासमार होत असल्याची तक्रार केली आहे.
नोएडातील सचिन नावाच्या तरुणाशी सोशल मिडीयाद्वारे प्रेमात पडून सीमा हैदर तिच्या चार मुलांसह पाकिस्तानातील स्वत:चा नवरा आणि संसार सोडून आली तेव्हापासून यांची अनोखी लव्हस्टोरी चर्चेत आहे. सचिन आणि सीमाला पाहण्यासाठी अनेकांनी घरासमोर गर्दी केली होती. त्यापैकी काहींनी तिला गिफ्टही दिले होते. तसेच तीने येताना स्वत: बरोबर काही लाखांची कॅशही आणण्याचे म्हटले जात होते. परंतू आता त्यांचे हलाखीचे दिवस सुरु झाले आहेत.
सचिनचे वडील नेत्रपाल म्हणाले आहेत की आम्ही लोक रोजचं कमवून खाणारे लोक. जर घराबाहेर पडलो नाही तर काय कमविणार आहे. पोलिसांनी घराबाहेर जाण्यास मनाई केल्याने आता आमचा रोजगार बंद पडला आहे. घरातील राशन संपले आहे. आम्ही स्थानिक अधिकाऱ्यांना पत्रही लिहीले आहे. आमची व्यथा त्यांनी वरपर्यंत पोहचावावी असेही त्यांनी म्हटले आहे. आमच्या पोटापाण्याची व्यवस्था काही तरी व्हायला हवी. किती दिवस असे चालणार आम्ही चौकशीला तयार आहोत. मग आम्हाला कशा नजरकैदेत ठेवले आहे. आता मिडीयाने तरी आमची व्यथा सरकारपर्यंत पोहचवावी असे सचिनचे वडील नेत्रपाल सिंह यांनी म्हटले आहे.
सीमा आणि सचिन प्रकरणात आतापर्यंत दोन जणांना अटक झाली आहे. दोन्ही युवक सचिन याचे नातेवाईकच आहेत. यांनी बोगस आधारकार्ड बनविल्याच्या प्रकरणात अटक झाली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 15 बोगस आधारकार्ड जप्त केली आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून आधारकार्ड तयार करणारे डीव्हाईस देखील जप्त केले आहे. पोलिस या प्रकरणात काही बोलण्यास तयार नाही. सचिन याने दिलेल्या माहीती आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.
सीमा हैदर प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. सीमाकडे सापडलेले सर्व पासपोर्ट नोएडा पोलिसांनी जप्त केले आहेत. सीमाकडे सापडलेली सर्व कागदपत्रे पाकिस्तानी दुतावासाकडे पाठविली आहेत. त्यामुळे सीमा नक्की पाकिस्तानी आहे की नाही याचा खुलासा होणार आहे. तसेच सीमाकडील जप्त मोबाईलमधून डेटा लिक झाला होता का ? याचाही तपास सुरु आहे. सीमाचा मोबाईल गाजियाबाद येथील फोरेन्सिक तपासासाठी पाठविला आहे. त्याचा अहवाल येणे बाकी आहे.
दुसरीकडे पाकिस्तान सीमाची खरी ओळख स्पष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे. सीमाने आपण आता हिंदू झालो असून पाकिस्तानात जाणार नसल्याचे म्हटले आहे. नेपाळमध्ये माझा आणि मुलांचा धर्म बदलला होता. सचिनसाठी करवॉं चौथ देखील केला. मी गुप्तहेर नाही. हवी तर सीबीआय किंवा रॉ द्वारे चौकशी करावी परंतू आपल्याला पुन्हा पाकिस्तानात जायचे नाही असेही तिने म्हटले आहे.