जयपूर (राजस्थान): आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर प्रत्येक राज्यात भाजप (BJP) अत्यंत खबरदारीने डावपेच टाकतेय. मात्र अंतर्गत वादांनी पोखरल्या गेलेल्या काँग्रेसच्या मागचं शुक्लकाष्ठ संपायचं नाव घेत नाहीये. मोजक्याच राज्यात काँग्रेसची सत्ता आहे, मात्र त्यातील काही राज्यांमध्ये दुफळीचं चित्र आहे. राजस्थान काँग्रेसमधला दोन दिग्गज काँग्रेस नेत्यांमधला संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी अशोक गहलोत सरकारविरोधातच दंड थोपटले आहेत. यासोबतच राष्ट्रीय पातळीवरील हायकमांडलाही त्यांनी मोठा संदेश दिलाय. आज सकाळपासूनच सचिन पायलट जयपूर येथे उपोषणाला बसले असून आंदोलन स्थळी लावलेले बॅनर्स चर्चेत आहेत.
#WATCH | Rajasthan Congress leader Sachin Pilot at Shaheed Samark in Jaipur begins his daylong fast calling for action on alleged corruption during the previous BJP government in the state pic.twitter.com/PeFLSRbYMq
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) April 11, 2023
सचिन पायलट यांनी आज सकाळी ११ वाजेपासून उपोषण आणि मौन आंदोलनाला सुरुवात केली आहे. आंदोलन स्थळी त्यांनी लावलेले पोस्टर सध्या चर्चेचा विषय़ ठरत आहे. काँग्रेसचा नेता उपोषणा बसलाय आणि बॅनरवरून हायकमांडचे फोटो गायब आहेत. पायलट यांच्या बॅनरवर फक्त महात्मा गांधीजी झळकत आहेत. राहुल गांधी, सोनिया गांधींसाठी हा मोठा इशारा आहे. तर सचिन पायलट यांच्यासाठीदेखील ही धोक्याची घंटा असू शकते. त्यामुळे देशभरात सध्या सचिन पायलट हे नाव ट्रेंड करतंय.
राजस्थानमधील काँग्रेसचा युवा चेहरा सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर भाजप नेत्यांशी संगनमत केल्याचा आरोप केलाय. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना भ्रष्टाचारातून वाचविल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. राजस्थान सरकारने वसुंधरा राजे यांच्या काळातील भ्रष्टाचारावर कारवाई न केल्यास आपण एक दिवसीय उपोषण करणार असल्याचा इशारा पायलट यांनी दिला होता. त्यानुसार आज सचिन पायलट उपोषणाला बसले आहेत.
पायलट यांच्या या इशाऱ्यानंतर काँग्रेसला मोठा झटका बसणार का, अशा चर्चा सध्या देशपातळीवर रंगल्या आहेत. गुलाम नबी आझाद यांच्याप्रमाणे सचिन पायलटदेखील काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार का, अशी चर्चा आहे. राजस्थानमध्ये येत्या सहा ते आठ महिन्यांत विधानसभा निवडणुका लागणार आहेत. त्यापूर्वी राजकीय घडामोडींना मोठा वेग आलाय. सचिन पायलट आणि अशोक गहलोत यांच्यातील शीतयुद्ध पहिल्यांदाच उफाळून आलंय असं नाही. यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकांनंतरही मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेवरून हा वाद उफाळला होता. गेल्या वर्षीही दोघांमधील धुसफूस हायकमांडपर्यंत पोहोचली होती. आता तर सचिन पायलट यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर काँग्रेस हायकमांडकडून काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.