बरेली : विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची या त्यांच्या वादग्रस्त वक्त्वयामुळे नेहमीच चर्चेत असतात. रविवारी साध्वी प्राचीने लव्ह जिहादबाबत मोठे वक्तव्य केले आहे. लव्ह जिहाद विषयी त्या म्हणाल्या की, देशभरातील सर्व मदरसे बंद करावेत. त्या मदरसे असतात तेथूनच लव्ह जिहादची सुरुवात होते. त्याचबरोबर त्या असंही म्हणाल्या की, हिंदू फक्त पैसा कमावण्याचा विचार करत असतात. तर एका विशिष्ट समाजाचे लोक भारतावर राज्य करण्याचा विचार करतात, त्यामुळे त्यांचा तो हजारो वर्षांपासून अजेंडा सुरू आहे.
साध्वी प्राची बरेलीमध्ये माध्यमांशी बोलत असताना त्या म्हणाल्या की, ज्या दिवशी भारतात मदरसे बंद होतील. त्याचवेळी देशातून लव्ह जिहादही संपेल. केवळ भारतातच नाही तर इतर देशांमध्येही शांतता नांदणार असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी साध्वी प्राची यांनी अखिलेश यादव यांनाही डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. समजावादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी पुन्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न सोडून दिले पाहिजे असं साध्वी प्राची यांनी आपले मत व्यक्त केले. ते यूपीचे मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानही होणार नाहीत असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदीच बाजी मारणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. कारण त्यावेळीही देशातील जनता पंतप्रधान मोदींनाच मतदान करणार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी बोलून दाखवला आहे. त्याचबरोबर उत्तराखंडमध्ये एकही मशीद हटवण्यात आली नसल्याचेही हिंदूत्ववादी नेत्याने सांगितले.
राज्यात केवळ बेकायदेशीर थडगी आहेत तिच पाडली जात आहेत. उत्तराखंड सरकार राज्यातील बेकायदा धार्मिक बांधकामांविरोधात अतिक्रमणविरोधी मोहीम राबवत असून देवभूमीत बिगर हिंदूंची संख्या वाढत असल्याचे वादग्रस्त वक्तव्यही त्यांनी केले आहे.
उत्तराखंडमधून हिंदू स्थलांतरित होत असून त्याबाबत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
आजकाल लव्ह जिहाद आणि जबरदस्तीने धर्मांतराची अनेक प्रकरणे देशभरात समोर आली आहेत. देशाची राजधानी दिल्लीपासून मध्य प्रदेशपर्यंत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत.
दिल्लीजवळील गाझियाबादमध्येही एका गेमिंग अॅपच्या माध्यमातून धर्मांतराचा प्रकार समोर आल्याचे सांगत हे प्रकार वाढीस लागले आहेत असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.