नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह काढून घेतलं आहे. निवडणूक आयोगाने हे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे मूळ शिवसेनेपासूनच बेदखल झाल्याने शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. उद्धव ठाकरे यांच्या हातून धनुष्यबाण चिन्ह गेलं असलं तरी मशाल चिन्ह घेऊन उद्धव ठाकरे पुढे जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, आता मशाल चिन्हावरही गडांतर येण्याची शक्यता आहे. समता पार्टीने मशाल या चिन्हावर दावा केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या हातून मशाल चिन्ह जाणार की राहणार? याविषयीचे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
समता पार्टीचे राष्ट्रीय महासचिव कैलास झा यांनी निवडणूक आयोगाला पुन्हा पत्र पाठवून मशाल निवडणूक चिन्हाची मागणी केली आहे. आमचं चिन्ह आम्हाला परत द्यावं. काल तुम्ही निकाल दिला आहे. त्यामुळे आता आमचं चिन्ह द्यायला काही हरकत नाही, असं कैलास झा यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.
निवडणूक आयोगाचा काल निकाल आला आहे. त्यांनी शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह दिलं आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आलं होतं. त्यामुळे आमचं मशाल चिन्ह शिवसेनेला दिलं होतं. आता शिवसेनेला त्यांचं धनुष्यबाण हे चिन्ह देण्यात आलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने आम्हाला आमचं चिन्हं द्यायला हवं, अशी मागणी झा यांनी केली आहे.
झा यांची ही मागणी निवडणूक आयोग मान्य करते का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. झा यांची मागणी निवडणूक आयोगाने मान्य केल्यास ठाकरे गटासमोर पुन्हा अडचणी निर्माण होणार आहेत. त्यांना नवं चिन्ह घेऊन निवडणुका समोरे जावं लागेल, असं चित्र आहे.
माजी आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी येथे विधानसभेची पोटनिवडणूक लागली होती. यावेळी शिंदे गटाने ठाकरे गटाला धनुष्यबाण देऊ नये, धनुष्यबाण चिन्ह आमचं आहे. आम्हीच ओरिजिनल शिवसेना आहोत, असा दावा केला होता. निवडणूक आयोगाने त्यावर निर्णय देत धनुष्यबाण चिन्ह गोठवलं होतं.
तसेच शिंदे गटाला ढाल तलवार आणि ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिलं होतं. मात्र, शिंदे गटाने ही निवडणूक लढवली नव्हती. भाजपने ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता.
अंधेरीच्या निवडणुकीत शिंदे आणि ठाकरे गटाला वेगवेगळी चिन्हे देण्यात आली होती. त्यात मशाल चिन्हाचाही समावेश होता. धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. आता धनुष्यबाण चिन्ह पुन्हा बहाल करण्यात आलं आहे. त्यामुळे आमचं मशाल चिन्ह आम्हाला परत दिलं पाहिजे, अशी मागणी समता पार्टीकडून होत आहे.
दरम्यान, आज ठाकरे गटाची मातोश्रीवर बैठक होत आहे. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय होणार आहेत. ठाकरे गट निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. त्यावरही आजच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.