नवी दिल्ली: ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गंभीर इशारा दिला आहे. फायलीचं राजकारण करू नका. अशा अनेक खूप फायली निघू शकतात. तुमच्या घरातील सुद्धा. ही फायलिंगची लढाई सुरू झाली तर सर्वांनाच महागात पडेल, असा इशारा संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा इशारा दिला.
शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले होते. त्याचा संजय राऊत यांनी समाचार घेतला. शेवाळेंनी जे आरोप केले. त्याला आपल्या शुद्ध मराठी भाषेत हलकटपणा आणि नीचपणा म्हणतात. सुशांतसिंग राजपूत प्रकरण हे तेव्हाच्या विरोधी पक्षाने अशा पद्धतीने उभं केलं आणि शेवटी ते त्यांच्यावरच उलटलं, असं संजय राऊत म्हणाले.
सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयसह अनेक तपास यंत्रणांनी केला आहे. सुशांतने आत्महत्याच केल्याचं सीबीआयने सांगितलं. असं असतानाही ज्यांच्यावर बलात्कारापासून विनयभंगापर्यंत अनेक आरोप आहेत अशा व्यक्तीने, कालपर्यंत जो शिवसेनेच्या ताटात जेवत होता त्याने आदित्य ठाकरेंवर आरोप करणं म्हणजे फुटीर लोक किती खालच्या थराला गेले आणि किती वैफल्यग्रस्त आहेत हे दिसून येतं, असा हल्ला राऊत यांनी चढवला.
दोन दिवसांपासून नागपूरच्या विधानसभेत सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर भूखंड भ्रष्टाचाराचे आरोप सुरू आहे. त्याला तोंड देताना सरकारची धावपळ सुरू आहे. त्यातून लक्ष विचलीत करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप कोणी करत असतील तर ते भ्रमात आहेत, असा इशाराच त्यांनी दिला.
कोण बिहार पोलीस? महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही का? सीबीआयवर विश्वास नाही का? या प्रकरणाचा बिहार पोलीस तपास करणार का? काय बिहार पोलीस, बिहार पोलीस चालवलं? बिहार पोलीस त्यांच्या राज्यात. सीबीआयने एकदा क्लिनचीट दिल्यानंतर त्यात बिहार पोलीसचा काय संबंध येतो? असा सवालही त्यांनी केला.
हे प्रकरण मुळात ज्यांनी काढलं त्यांनी आपला अंतरात्मा चेक करावा. जी व्यक्ती ज्या सभागृहाची सदस्य नसते त्यावर बोलता येत नाही. विषय काय होता आणि बोलत काय होते. राज्यात जनक्षोभ आहे. मुख्यमंत्र्यांविरोधात आणि सरकार विरोधात. त्यामुळे हे घाणेरडे आरोप केले जात आहेत, असंही ते म्हणाले.