नवी दिल्ली : महाराष्ट्र पुरात बुडत असताना मुख्यमंत्री दिल्लीत काय करत आहेत, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना केला आहे. शिवसेनेतील बंडखोरांवर टीका करताना संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिल्यानंतरही खासदार शिवसेनेत थांबले का, असा सवालही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. हे सरकार कधीही कोसळू शकते असे सांगत सर्व संकटांना तोंड देण्यास शिवसेना समर्थ आहे. पुन्हा एकदा शिवसेना पूर्ण ताकदीनिशी समोर येईल, असे राऊत म्हणाले. शिवसेना (Shivsena) उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यूपीएसोबत असणार आहे. यूपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळेला संजय राऊत उपस्थित होते.
राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार कोणत्याही पक्षाचे नसतात. द्रौपदी मुर्मू किंवा मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा म्हणजे एनडीए किंवा यूपीएला पाठिंबा असे नाही. आदिवासी समाजातील महिलेला संधी मिळत आहे. महाराष्ट्रातही आदिवासी समाज आहे. आमदार आहेत, खासदार आहेत. स्वातंत्र्यामध्ये आदिवासी समाजाचे मोठे योगदान आहे. शेकडो आदिवासी शहीद झाले. त्यांचे प्रतिनिधी म्हणून हा पाठिंबा आहे आणि हा केवळ संजय राऊत नाही, तर शिवसेना पक्षाचा पाठिंबा आहे, असे संजय राऊत म्हणाले.
शिवसेनेतून गेलेले लोक कारणे शोधत असतात. शिवसेनेने एनडीए उमेदवाराला राष्ट्रपतीपदाबाबत पाठिंबा दिला तर उपराष्ट्रपतीपदालाही पाठिंबा दिला असता, तर शिवसेनेला बळ मिळाले असते, या प्रश्नावर राऊत बोलत होते. मुर्मूंना पाठिंबा दिल्यानंतर तरी किती लोक थांबले शिवसेनेत, असा सवाल त्यांनी केला. ईडीच्या रडारवर असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे एकनाथ शिंदेंना महाराष्ट्र सदनात भेटले. यावर संजय राऊत म्हणाले, की त्यात काही विशेष नाही. दरम्यान, दिल्लीमध्ये काहीही घडामोडी सुरू नाहीत. घडामोडी केवळ वृत्तवाहिन्यांवर सुरू आहेत, असा टोला त्यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रातील अनेक जिल्हे पुरात बुडालेत आणि मुख्यमंत्री दिल्लीत राजकारण करत आहेत, असा घणाघात त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे. मंत्रिमंडळाचा पत्ता नाही. काल एसटी महामंडळाची बस अपघातात गेली. कितीतरी लोक मेले. अजून परिवहन मंत्री नाही. सरकारचे अस्तित्व नाही. सरकारवर टांगती तलवार आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. दानवेंवर टीका करताना ते म्हणाले, की जशी रावसाहेब दानवेंची त्यांच्या पक्षावर निष्ठा आहे, तशी माझी माझ्या पक्षावर निष्ठा आहे.