चहा विकून शिकले, मोदींची डिग्री देशाला समजलीच पाहिजे, संजय राऊत यांचा रेटा सुरुच!

| Updated on: Apr 03, 2023 | 11:11 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीवरून आता चांगलंच राजकारण तापलं आहे. खरं तर मोदी यांनी स्वतः पुढे येऊन स्वतःची डिग्री दाखवावी, असं आवाहान संजय राऊत यांनी केलंय..

चहा विकून शिकले, मोदींची डिग्री देशाला समजलीच पाहिजे, संजय राऊत यांचा रेटा सुरुच!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लहानपणी चहा विकून स्वतचं शिक्षण पूर्ण केलं. मग त्यांनी घेतलेली डिग्री लपवण्याचं काय कारण, असा सवाल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा विचारला आहे. काल उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर येथील महाविकास आघाडीच्या सभेत मोदींवर त्यांच्या डिग्रीवरून निशाणा साधला. तर आज संजय राऊत यांनीदेखील हाच मुद्दा लावून धरला आहे. पंतप्रधानांची डिग्री मागणाऱ्या केजरीवालांवर २५ हजार रुपयांचा दंड लावतात, हा कुठला न्याय आहे, असा सवाल संजय राऊत यांनी विचारलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री सार्वजनिक करावी, या मागणीच्या एक खटल्यात गुजरात कोर्टाने ही डिग्री दाखवण्याची गरज नाही, असे आदेश दिले तर, अरविंद केजरीवाल यांना २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.

पुढे येऊन खुलासा करा…

नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, पंतप्रधानांनी खरं तर स्वतः येऊन पुढे येऊन खुलासा केला पाहिजे. नव्या संसद भवनाच्या मुख्यद्वारावर ही डिग्री लावली पाहिजे. भाजपच्या बहुतांश नेत्यांची डिग्री बोगस आहे. दहा लोकांची नावं घ्या आणि त्यातील बहुतांश नेत्यांची डिग्री बोगस असेल. अरविंद केजरीवालांना या प्रकरणात 25 हजारांचा दंड ठोठावला. का कुठला कायदा आहे? मोदी चहा विकून शिकले. त्यांनी प्लॅटफॉर्मवर चहा विकला. बीए एम ए विथ इंटायर पॉलिटिकल सायन्स.. ऐतिहासिक आणि क्रांतिकारी विषयात पदवी घेतली आहे. ही त्यांची डिग्री संसदेला समजली पाहिजे. मोदींनी नवी संसद बनवली, तिथं लावावी. त्यात लपवण्यासारखं काय आहे, असा सवाल राऊत यांनी केला.

नाना पटोले नाराज?

महाविकास आघाडीच्या संयुक्त सभांमधील पहिली सभा काल संभाजीनगरात पार पडली. मात्र यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची गैरहजेरी होती. प्रकृती अस्वास्थ्याचं कारण त्यांनी दिलं, मात्र यावरून आता राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. यावरून संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितलं. ते म्हणाले, ‘ नाना पटोले उपस्थित नव्हते हे खरं आहे. त्यांची प्रकृती ठीक नव्हती. मी माहिती घेतली. त्यांच्याशी बोलताना मला जाणवलं. कॉंग्रेसचे इतर नेते उपस्थित होते, त्यामुळे महाविकास आघाडीत नाराजी आहे, या चर्चा व्यर्थ आहेत.

पंतप्रधानांबाबत बोलताना तारतम्या बाळगा- दानवे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीवरून विरोधकांकडून जोरदार टीका होतेय. भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले आहेत. पंतप्रधानांच्या संदर्भात वक्तव्य करताना थोडंतरी तारतम्य ठेवायला पाहीजे.आजकाल न्याय संस्थेवर यांचा विश्वास राहीला नाही. कोर्टाच्या निकालावर भरोसा यांचा नाही, हे चुकीचं असल्याचं दानवे म्हणाले. कालच्या महाविकास आघाडीच्या सभेवर टीका करताना रावसाहेब दानवेंनी खोचक टीका केली. आओ चोरों बांधो भारा, आधा तुम्हारा आधा हमारा… अशी ती सभा होती. तीन पक्षांचे मिळून एवढे कमी लोक सभेला हजर होते, यावरूनच त्यांची ताकद कळते, अशं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलंय.

 

 

.