नवी दिल्ली: माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे यंग ग्लोबल लीडर्स ठरले आहेत. द वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जाहीर केलेल्या यादीत आदित्य ठाकरे यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून आनंद व्यक्त केला जात आहे. आदित्य ठाकरे यांची थेट जगानेच दखल घेतल्याने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे हे शिवसेनेचेच नव्हे तर महाराष्ट्राचे भवितव्य आहे हे मी आधीच सांगत होतो. त्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे, असं संजय राऊत म्हणाले. राऊत मीडियाशी संवाद साधत होते.
आदित्य ठाकरे यांचा या यादीत समावेश होणं हा महाराष्ट्राचा गौरव आहेच. पण देशाचाही गौरव आहे. काल देशात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. एक म्हणजे देशाला ऑस्कर मिळालं. तसेच काल जगातील शक्तीशाली तरुण नेतृत्वात आदित्य ठाकरे यांचा समावेश झाला. मंत्री म्हणून आणि राजकीय नेता म्हणून आदित्य ठाकरे यांनी ठसा उमटवला आहे. जागतिक पातळीवरून आदित्य ठाकरे यांच्या कार्याला दिलेली ही मान्यता आहे. आम्ही आनंदीत आहोत. आदित्य ठाकरे हे शिवसेनेचं आणि राज्याचं भवितव्य आहेत, हे मी वारंवार सांगतो होतो. त्यावरच आता शिक्कामोर्तब झालं आहे, असं संजय राऊत म्हणाले.
गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे परिवार किंवा शिवसेना असेल प्रत्येकाबाबत खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. फक्त ठाकरे परिवाराला लक्ष्य केलं जात आहे. या राज्याचं प्रशासन आणि राजकारण सुरू आहे. न्यायालयातील न्याय मेला नाही. सर्वोच्च न्यायालय आणि हायकोर्टातून अजूनही न्यायाची अपेक्षा आहे. ठाकरे परिवाराला बदनाम करण्याचा कट रचला त्याचे सूत्रधार कोण माहीत आहे. तरीही आम्ही प्रकरण शांतपणे हाताळले. खोकेवाल्यांचा हिशोब मागितला पाहिजे. ते आमचा हिशोब मागत आहे. तुम्ही कोणताही हल्ला करा. कायदेशीर असो की बेकायदेशीर आम्ही हल्ला परतवून लावू, असं राऊत यांनी ठणकावलं.
फक्त विरोधी पक्षाच्या नेत्यांनाच टार्गेट केलं जातं. अटक केली जात आहे. राज्यासह देशातली सर्व विरोधकांना त्रास दिला जात आहे. सत्ताधारी पक्षाचे नेते जणू काय दुधाने आंघोळ करत आहेत. नारायण राणे बाबत भाजपची काय भूमिका होती, हे सर्व पुरावे समोर आले. ते भाजपमध्ये गेले अन् वॉशिंग मशीनमधून धुवून निघाले. खरंतर भाजपच्या म्हणण्यानुसार राणेंपासून आसामच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत तुरुंगात असायला हवे होते, असंही ते म्हणाले.
विरोधी पक्षांवर चुकीच्या पद्धतीने कारवाया सुरू आहेत. नवाब मलिक, अनिल देशमुख, हसन मुश्रीफ, अनिल परब, सदानंद कदम असेल की मी असेल… प्रत्येकावर राजकीय सुडानेच कारवाया सुरू आहेत. काल मी भीमा पाटील सहकारी कारखान्याचं प्रकरण दिलं. पुराव्यासह दिलं. ते म्हणतात राऊतांनी ते दिलं म्हणजे तो पुरावा असू शकत नाही. मी पुराव्यासकट दिलंय.
सोमय्या जे भंपक आरोप करतात ते कोणत्या आधारे करतात? असा सवाल करतानाच क्राऊड फंडिंग प्रकरणात साकेत गोखले आत असतील तर तसाच क्राऊड फंड आयएनएस विक्रांतसाठी गोळा केला. सोमय्यांना क्लीनचिट कशी मिळते. याचा अर्थ स्पष्ट आहे. सरकार विरोधात आवाज उठवणाऱ्यांना त्रास दिला जात आहे. त्यांचा छळ केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
आज आम्ही विरोधी पक्षाचे सर्व खासदार ईडीच्या कार्यालयावर मार्च काढणार आहोत. या देशात आणि जगात अदानी कंपन्यांचा सर्वात मोठा घोटाळा झाला. त्याची दखल कधी घेणार? आम्ही ईडीच्या संचालकांना भेटून तक्रार दाखल करणार आहोत, असं राऊत म्हणाले.
पत्राचाळ प्रकरणावर सुनावणी सुरू होणार आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. होऊ द्या ना. पत्राचाळ होऊ द्या. सिमेंट चाळ होऊ द्या, दगडी चाळ होऊ द्या… आय डोन्ट केअर. हे खोटारडे लोकं आहेत. भंपक लोकं आहेत. न्यायालयाने माझ्याविषयी जे काही भाष्य केलंय. ते फार महत्त्वाचं आहे, असं त्यांनी सांगितलं.