नवी दिल्ली : राजकारणातील कटुता संपली पाहिजे, असं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही महिन्यांपूर्वी म्हणाले होते. फडणवीस यांच्या या विधानाचं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समर्थनही केलं होतं. त्याचाच आज उत्तरार्ध पाहायला मिळाला आहे. संजय राऊत यांनी चक्क देवेंद फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने नागपुरात कॅन्सर रुग्णालय उभारण्यात आलं आहे. त्यामुळे या कामासाठी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच कोणताही प्रश्न विचारण्याआधीच राऊत यांनी फडणवीस यांचं कौतुक केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. राऊत यांच्या या विधानामुळे फडणवीस आणि ठाकरे गटातील कटुता संपणार का? अशी चर्चाही या निमित्ताने रंगली आहे.
महाराष्ट्रातील राजकारण्यांनी राजकारणापलिकडे जाऊन संस्ता उभा केल्या आहेत. रुग्णालये, विद्यापीठे, शाळा, महाविद्यालये आणि साखर कारखान्यांचा समावेश आहे. त्या परंपरेला साजेसं कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपुरात उभं राहिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे हे रुग्णालय उभं राहिलं आहे. त्याबद्दल त्याचं कौतुक आहे. अशा कार्याची गरज आहे. राजकारण्यांनी अशा कार्यात लक्ष घालावं, असं संजय राऊत म्हणाले.
राज्यात आरोग्य विषयक चांगली संस्था उभी राहते याचं कौतुक केलं पाहिजे. मी संस्थेची माहिती घेतली. या देशात अशा संस्थेची गरज आहे. फडणवीस यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या वडिलांचं निधन कॅन्सरने झालं होतं. त्या वेदनेतून त्यांनी रुग्णालयाचं काम हाती घेतलं असेल. कुणीही हे काम केलं असतं तरी ते कौतुक करण्यासारखच आहे, असंही राऊत म्हणाले.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर टीका करताना यांची जोडे पुसायची लायकी नाही, असं म्हटलं होतं. त्याचं संजय राऊत यांनी समर्थन केलं आहे. जोडे पुसायची लायकी नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. ते बरोबर आहे. या लोकांना जनता जोडे मारणार आहे. त्या विधानाबाबत खेद वाटण्याची गरज नाही. शिवसेनेने सामान्य कार्यकर्त्यांना सर्वोच्च पदावर नेऊन ठेवलं. केवळ ठाकरे कुटुंबामुळे आम्ही विविध पदावर गेलो. असं कोणतंही सर्वोच्च पद नाही की ते ठाकरे कुटुंबाने सामान्य माणसाला दिलं नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची चीड योग्य आहे, असं राऊत म्हणाले.
जोडे पुसण्याची लायकी नाही हे त्या अर्थाने घेऊ नका. लोक गद्दारांना जोडे मारतील. उद्धव ठाकरे यांनी कुणाचंही नाव घेतलं नाही. कुणी आपल्यावर का ओढून घ्यावं? जोडे पुसण्याच्या लायकीचे आहोत. सिंहासनावर बसलो असं तुम्हाला वाटतं का? सत्तेच्या पदावर ठाकरेंनीच आम्हाला बसवलं आहे. शिवसेना नसती तर आम्ही कुठे असतो? असा सवाल त्यांनी केला.