नवी दिल्ली: ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या कार्यालयाबाहेर झालेल्या राड्यावरून खासदार संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या राड्यावरून संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे. तसेच किरीट सोमय्या यांचा उल्लेख मुलुंडचा पोपटलाल असा केला आहे. यापुढे आमच्यावर चुकीचे आणि खोटे आरोप केले तर त्यांना शिवसैनिक राड्यानेच उत्तर देतील, असा संतप्त इशाराच किरीट सोमय्या यांना संजय राऊत यांनी दिला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
असे राडे यापुढे होतील. तुम्ही खोटे गुन्हे दाखल करणार असाल तर आम्ही राडे करून खरे गुन्हे घ्यायला तयार आहोत. अनिल परब यांच्या ज्या कार्यालयावर हातोडा मारला ते त्यांचं कार्यालय नव्हतं. तसं म्हाडाने स्पष्ट केलं आहे. तरीही भाजपचा मुलुंडचा पोपटलाल वारंवार आमच्यावर आरोप करत आहे. कधी अनिल परब, कधी संजय राऊत तर कधी किशोरी पेडणेकर यांच्या बदनामीच्या मोहिमा सुरू आहेत. या मोहिमा आता आम्ही थांबवू, असं संजय राऊत म्हणाले.
ज्या भाजपच्या पुरस्कृत उद्योगपतीने देशाला खड्ड्यात घातलं. ती केस मनी लॉन्ड्रिंगची आहे. शेल कंपन्या सिंगापूरला लावून देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली. त्यावर हे पोपटलाल का बोलत नाहीत? तुमच्यात हिंमत असेल तर बोला ना. बूच का बसले तोंडाला? असा सवाल त्यांनी केला.
यावेळी त्यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्राबाबत केंद्र सरकारनं एक स्वतंत्र आणि वेगळी भूमिका घ्यावी. खासकरून मुंबईसाठी वेगळी भूमिका घेतली पाहिजे. पंतप्रधान अलिकडे वारंवार मुंबईत येत आहेत. महापालिकेतील पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी म्हणजे आम्ही सादर केलेल्या कामाचीच उद्घाटनं पंतप्रधान करत आहेत.
पंतप्रधान महिन्याभरात दोनदा मुंबईत येत आहेत. याचं कारण स्पष्ट आहे की मुंबई पालिका हे त्यांचं लक्ष आहे. केवळ राजकारणासाठी मुंबईत येऊ नका. महाराष्ट्रासाठी काही तरी घेऊन या. म्हणजे राज्य करण्याची तुमची भूमिका समतोल आहे असं वाटेल, असा टोला त्यांनी लगावला.
केंद्राच्या तिजोरीतील मोठा वाटा मुंबईतून जातो. अनेक गरीब राज्यांचं पोट मुंबईमुळे भरलं जातं. मुंबईत अनेक प्रकल्प अर्धवट आहेत. आम्ही त्याबाबत पत्रं दिली आहेत. सरकार बदललं असलं तरी आम्ही जी काही कामं सूचवली आहे. त्याबाबत अर्थमंत्री विचार करतील अशी आशा आहे, असंही ते म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून आपण देश लुटला जातोय हे पाहत आहोत. कुणाचं नाव घेत नाही. त्या लुटीच्या पैशात मुंबईचाही पैसा आहे. त्यामुळे भरपाई होईल. अनेक प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले. मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होतोय. या बजेटनं काही भरपाई केली तर केंद्राचे आभारी राहू. हा भाजपचा पैसा नसून जनतेचा आहे. हे बजेट भाजपचं नसून जनतेचं आहे, असा टोला त्यांनी लगावला.