नवी दिल्ली: राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल लागले आहेत. या निवडणुकीत भाजपला अपयश आलं असून महाविकास आघाडीचा मोठा विजय झाला आहे. मात्र, तरीही भाजपकडून विजयाचे दावे केले जात आहे. खुलासे केले जात आहे. भाजपच्या या दाव्यांवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. भाजपने फालतू खुलासे करणे करू नये. राज्यातील जनतेने भाजपला पूर्णपणे नाकारलं आहे, अशी टीका संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
पाच पैकी फक्त एक जागा जेमतेम भाजपने जिंकली आहे. तीही उधार उसनवारीचा उमेदवार होता म्हणून जिंकले. ती जागा शेकापची होती. शिवसेनेकडे असती तर वेगळा निकाल लागला असता. महाराष्ट्रातील उच्च मध्यमवर्गीय, पदवीधरांनी भाजप आणि त्यांच्या सरकारचा पराभव केला आहे. भाजपला नाकारलं आहे.
भाजपने उगाच फालतू खुलासे करू नये. महाराष्ट्रात जे चाललंय हे लोकांना मान्य नाही. लोक निवडणुकीची वाट पाहत आहेत. आम्ही महाविकास आघाडी म्हणून प्रत्येक निवडणूक एकीने आणि मजबुतीने लढत आहोत, असं संजय राऊत म्हणाले.
नागपूरची जागा ही शिक्षक मतदारसंघाची जागा आहे. ती शिवसेनेसाठी सुटली होती. पण आडबोले जिंकू शकतात हे लक्षात आल्यावर आम्ही ती जागा काँग्रेसला दिली. महाविकास आघाडी म्हणून आम्ही निर्णय घेतला, असं सांगतानाच सत्यजित तांबे काँग्रेस सोबतच राहतील. शुभांगी पाटील झाशीच्या राणीसारख्या लढल्या, असं राऊत यांनी सांगितलं.
विदर्भातील जनता सुद्धा भाजपच्या कारभाराला विटली आहे. कंटाळली आहे. नागपूरमध्ये या आधी भाजपचा पराभव झाला. आताही शिक्षक मतदारसंघात भाजपचा पराभव झाला. याचा स्पष्ट संदेश जनतेने दिला आहे, असा दावाही त्यांनी केला.
आम्ही या पुढेही एकी आणि मजबुती कायम ठेवू. उमेदवार मागे घेताना वाईट वाटलं. पण एकास एक लढत देऊ असं सर्वांचं म्हणणं पडलं, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच या निवडणुकीत पाचपैकी एका जागी भाजपचा एक उमेदवार जिंकला. तोही त्यांचा नाही. भाजपकडे उमेदवारच नव्हते. हा भाजपला इशारा आहे. नाशिकला तर त्यांना उमेदवारच सापडला नाही. ही सध्याची परिस्थिती आहे, अशी टीका त्यांनी केली.
केंद्राच्या पुरातत्त्व खात्याने आग्र्याच्या किल्ल्यावर शिवजयंती साजरी करण्यास मनाई केली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे. कारण दिल्लीत त्यांचीच पावलं सध्या उमटत आहेत.
त्यांनी त्यांच्या महाशक्तीला सांगायला हवा. ज्या महाशक्तीने राज्यात सत्ता आणली. त्या महाशक्तीने आग्र्यात परवानगी द्यावी. आग्र्यात शिवजयंती साजरी होणार नसेल तर कुठे साजरी करायची? असा सवाल त्यांनी केला.