नवी दिल्ली | 10 ऑगस्ट 2023 : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी फ्लाईंग किस दिल्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपच्या महिला खासदारांनी थेट लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. तर भाजप नेत्या आणि मंत्री स्मृती ईराणी यांनी राहुल गांधी यांनी महिलांचा अपमान केल्याचं सांगत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. राहुल गांधी यांच्या या कृतीचा निषेध म्हणून आज भाजपच्या महिला कार्यकर्त्या आंदोलनही करणार आहेत. या सर्व घडामोडींवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाष्य करत भाजपला चिमटे काढले आहेत.
भाजप कोणत्या गोष्टीचं प्रदर्शन करेल, राजकारण करेल हे सांगता येत नाही. जंतरमंतरला कोणी गेलं होतं का? जंतरमंतरला महिला कुस्तीपटू बसल्या होत्या. तेव्हा कोणी गेलं नाही. राहुल गांधींनी द्वेष, बदला यावर उतारा म्हणून संपूर्ण देशाला प्रेमाचा किस दिला. जादूची झप्पी म्हणतो ना तसा जादूचा फ्लाईंग किस दिला. तो देशासाठी. या देशात मोहब्बतचं दुकान त्यांनी उघडलं आहे, त्यातील ते महत्त्वाचं शस्त्रं आहे. भारत जोडो यात्रेत त्यांनी जनतेला फ्लाईंग किस दिला आहे. पण ज्यांना प्रेमाची सवय नाही. ममत्व उरलं नाही. त्यांना प्रेमाचा फ्लाईंग किस समजणार नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. ते मीडियाशी संवाद साधत होते.
यावेळी त्यांनी अविश्वास ठरावावरही भाष्य केलं. अमित शाह यांनी भाषण करण्याचा विक्रम मोडल्याचं सांगण्यात आलं. अविश्वास ठराव का आणला कोणत्या कारणासाठी आणला हे देशाला माहीत आहे. मणिपूरच्या हिंसाचारावर देशाचे पंतप्रधान संसदेत येऊन निवेदन करायला तयार नाही. सरकार काय करतंय, पंतप्रधानांची भूमिका काय आहे हे समजून सांगायला तयार नाहीत.
त्यामुळे नाईलाज म्हणून लोकसभेत जरी आकडा कमी असला तरी हा ठराव आणावा लागला. आता त्यावर उत्तरे देत आहेत. ही उत्तरे नसून ही चिड चिड आहे. याला उत्तरे म्हणत नाहीत. गेल्या दहा वर्षात मणिपूरला काय झालं ते सांगा. गेल्या 40 वर्षात काय झलं ते सांगू नका, असा हल्लाच त्यांनी चढवला.
मणिपूरच्या हिंसेवरूनही त्यांनी भाजपला फटकारलं. जॉर्ज फर्नांडिस संरक्षण मंत्री असताना त्यांनी सुद्धा मणिपूरचा प्रश्न हा भविष्यात काश्मीरपेक्षा चिंताजनक होईल, असं म्हटलं होतं. काश्मीरपेक्षा मणिपूरचा धोका सर्वाधिक आहे हे ओळखायला पाहिजे. कारण त्याच्या बाजूला चीनच्या सीमा आहे किंवा अन्य देशाच्या सीमा आहेत. हा धोका एनडीएचं सरकार असताना जॉर्ज फर्नांडिस यांनी दिला होता. त्याचा अभ्यास केला पाहिजे.
बाकी गृहमंत्री काय बोलतात ते राजकीय भाषण आहे. त्यांनी उत्तर दिलं आहे. पंतप्रधान उत्तर देतील. ते आज बोलणार आहेत. विरोधकांनी मणिपूर संदर्भातील ठराव, नोटीस दिली होती, तेव्हाच मोदी बोलले असते तर आज अविश्वास ठराव आणण्याची वेळ आली नसती, असंही ते म्हणाले.
राऊत यांनी यावेळी ईडीवरही टीका केली. या देशात ईडीने जी दहशत निर्माण केली आहे. ज्या गोष्टीचा पोलीस तपास करू शकतात, ज्या गोष्टीचा तपास राज्याचा अर्थिक विभाग करू शकतो, तिथे ईडी घुसवून केंद्राने नियंत्रण ठेवायचं आणि विरोधकांवर दडपण आणून आपल्याकडे खेचायचं सुरू आहे. हा एक प्रकारे टेररिझम आहे. हे मी सांगत नाहीये. ज्येष्ठ कायदे पंडित हरिश साळवे यांनी कोर्टात यांनी सांगितलं आहे. ईडीला आवरलं नाही तर देशात अराजक निर्माण होईल असं त्यांनी सांगितलं. तेच मी रिपीट केलं आहे, असं ते म्हणाले.