फडतूस म्हणजे काय? संजय राऊत यांनी सांगितले चार अर्थ; म्हणाले, डिक्शनरी शोधा त्यात…

| Updated on: Apr 05, 2023 | 10:09 AM

उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फडतूस गृहमंत्री म्हटले. त्यावरून भाजपने ठाकरे गटाला धारेवर धरले आहे. उद्धव ठाकरे यांना बाहेर फिरू देणार नाही, असा इशाराच भाजप नेत्यांनी दिला आहे.

फडतूस म्हणजे काय? संजय राऊत यांनी सांगितले चार अर्थ; म्हणाले, डिक्शनरी शोधा त्यात...
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोशनी शिंदे मारहाण प्रकरणावरून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख फडतूस गृहमंत्री असा केला. त्यामुळे फडणवीस प्रचंड संतापले आहेत. मी फडतूस नाही काडतूस आहे. मी गृहमंत्री आहे, याचीच अनेकांना अडचण आहे. पण मी गृहमंत्रीपद सोडणार नाही. बेकायदेशीर काम करणाऱ्यांना तुरुंगात टाकणारच, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानाचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. एवढेच नव्हे तर राऊत यांनी फडतूस या शब्दाचे चार अर्थ सांगितले आहेत. डिक्शनरीत हे अर्थ असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तसेच कोर्टाने यापेक्षा अधिक कडक शब्दात तुमच्या सरकारवर ताशेरे ओढल्याची टीकाही राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस आणि भाजपला चांगलंच फैलावर घेतलं. डिक्शनरीत फडतूसचा शब्दाचा अर्थ दिलेला आहे. वर्थलेस. मिनिंगलेस, यूजलेस आणि बिनकामाचे लोक आहेत, असा अर्थ डिक्शनरीत आहे. हा शब्द आपण नेहमी वापरतो. हे सरकारच बिनकामाचं आहे, असं आपण नेहमी म्हणतो. त्यालाच उद्धव ठाकरे यांनी फडतूस हा शब्द वापरला आहे. त्यामुळे भिजलेलं काडतूस आत घुसायचं कारण नाही. तुम्ही काडतूस असाल हो… अशी भिजलेली काडतूसं महाराष्ट्रात आम्ही खूप पाहिली आहेत. भिजलेली काडतूसं महाराष्ट्रात उडत नाहीत, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी चढवला.

हे सुद्धा वाचा

मग आम्ही कुठले आहोत?

रोशनी शिंदे या महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण झाली. ती प्रेग्नंट होती. ती सांगत होती. तिच्या पोटात बाळ आहे. तरीही तिला मारहाण करण्यात आली. हे सगळं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. असं सरकार ज्या राज्यात आहे त्या सरकारलाच सर्वोच्च न्यायालयाने नपुंसक म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी अत्यंत सौम्य शब्दात फडतूस हा शब्द वापरला. आता फडतूसचा अर्थ नागपुरात वेगळा असेल. आम्ही नागपूरचे आहोत असं ते म्हणतात. मग आम्ही कुठले आहोत? आम्हीपण महाराष्ट्रातीलच आहोत आणि नागपूर महाराष्ट्रात आहे. नागपूर हे वेगळं नाही. ते वेगळं होऊ देणार नाही. फडतूस हा शब्द हा प्रचलित शब्द आहे. सर्वोच्च न्याायलयात कडक शब्दात नपुंसक म्हणून तुमच्या सरकारवर टीका केली, असंही ते म्हणाले.

तुम्हाला काय म्हणावं?

उद्धव ठाकरे फडतूस का म्हणाले? रोशनी शिंदे या महिलेवर जो हल्ला झाला. ते महाराष्ट्राने पाहिलं. गृहमंत्री झाल्याची काही लोकांना अडचण आहे, असं फडणीस म्हणाले. हो तुम्ही अडचणच आहात महाराष्ट्राला. महाराष्ट्राला अडचण आहे. आम्हाला नाहीये. तुमच्या डोळ्यासमोर, मंत्रालयासमोर तीन जणांनी आत्महत्या केली. त्यातील शीतल गाडेकर ही बाई मरण पावली. काल संगिता डवर ही बाई मरण पावली. ही तुमची मर्दानगी? सरकार समोर महिला आत्महत्या करत असतील आणि तुम्हाला त्याची खबर नाही तर तुम्हाला काय म्हणावं? असा संताप त्यांनी व्यक्त केला.