ईडी, सीबीआय बाजूला ठेवून या, काडतूस कुठं घुसतं ते दाखवतो; संजय राऊत यांचं भाजपला आव्हान

| Updated on: Apr 05, 2023 | 10:45 AM

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही जोरदार टीका केली. कोण बावनकुळे? त्यांना विचारा तुमचं तिकीट का कापलं होतं? तुमच्या हायकमांडने तुम्हाला घराबाहेर का पडू दिलं नव्हतं?, असा सवाल राऊत यांनी केला.

ईडी, सीबीआय बाजूला ठेवून या, काडतूस कुठं घुसतं ते दाखवतो; संजय राऊत यांचं भाजपला आव्हान
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीक केली आहे. उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला अत्यंत सौम्य शब्दात फडतूस म्हटलं आहे. तुम्ही स्वत:ला काय काडतूस म्हणता. तुम्ही तर भिजलेले काडतूस आहात. तुमचं खरं काडतूस कुठलं असेल तर सीबीआय आणि ईडी आहे. म्हणून तुमची मस्ती आणि चरबी आहे. ही ईडी आणि सीबीआय बाजूला ठेवून या. मग काडतूस कुठं घुसतं ते आम्ही दाखवतो, असं आव्हानच संजय राऊत यांनी दिलं आहे. तसेच देवेंद्र फडणवीस मिस्टर झुके आहेत. ज्याला दोन शब्द नीट बोलता येत नाही. अशा माणसाच्या बाजूला बसला आहात. हे झुकणच आहे, अशी टीका राऊत यांनी केली आहे.

तुम्ही आम्हाला धमक्या देता. आम्ही फाटके लोकं आहोत. काय करणार आम्हाला? परत सीबीआय आणि ईडीचे बॉडीगार्ड घेऊन येणार. ते तुमचे बॉडीगार्ड आहेत. काढा बाजूला मग काडतूसं दाखवतो. आमचा बाण तुम्ही घेतला तरी तो घुसला ना? महाराष्ट्रात एक परंपरा आहे. आणि संस्कृती आहे. ही त्यांनी मोडीत काढली आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. तुम्ही झुकलेला आहात. वाकलेला आहेत. ज्याला दोन शब्द नीट वाचता येत नाही. बोलता येत नाही. त्यांच्या नेतृत्वात मी काम करतो असं अभिमानाने म्हणतात त्याला झुकणं नाही म्हणत का? असा सवाल करतानाच मिस्टर फडणवीस तुम्ही झुकेच आहात, अशी टीकाही राऊत यांनी केली.

हे सुद्धा वाचा

तुमच्या पत्नीलाही घराबाहेर पडू दिलं नाही

यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार टीका केली. कोण बावनकुळे? त्यांना विचारा तुमचं तिकीट का कापलं होतं? तुमच्या हायकमांडने तुम्हाला घराबाहेर का पडू दिलं नव्हतं? नाही तर आम्ही सांगतो तुम्हाला का पडू दिल नाही ते. तुम्ही किती मोठा भ्रष्टाचार केला होता. जो दिल्लीपर्यंत गेला. म्हणून तुम्हाला त्यावेळेला घराबाहेर पडू दिलं नाही. तुम्हालाही पडू दिलं नाही आणि तुमच्या पत्नीलाही पडू दिलं नाही. तुम्ही त्यावर जरा खुलासा करा, असं आव्हानच राऊत यांनी बावनकुळे यांना दिलं.

बावनकुळे टांगा सांभाळा

तुम्ही काय लूट केली होती वीज खात्यात हे जर आम्ही बोलायला गेलो ना जरा कठीण होईल तुमचं. आम्ही अद्याप मर्यादा सांभाळल्या आहेत. शिवसेनेला धमक्या देऊ नका. हे तुमचं फिरणं आहे ना तुमच्या टांगावरचं. त्या टांगा सांभाळा. परत म्हणतो तुमची जी जीभ चुरूचुरू चालतेय ना. ती फक्त तुमच्याकडे ईडी आणि सीबीआय असल्यामुळेच. बाकी काही नाही. बाकी तुमच्यासारखे फुसके बार या महाराष्ट्रात खूप आले आणि गेले आणि पाहिले. आम्ही सत्तेसाठी नाही. सत्ता आमच्यासाठी आहे. शिवसेना हीच सत्ता आहे. हे आता सर्व पोपट बोलतील. बोला काही हरकत नाही, असं ते म्हणाले.

यांची काडतूसे उडणारच नाहीत

छत्रपती शिवाजी महाराज, आंबेडकर आणि फुले यांचा अपमान करणारे काल त्यांच्या व्यासपीठावर होते. शिवाजी महाराजांच्या अपमानाविरोधात गौरव यात्रा काढावी असं का वाटलं नाही या भिजलेल्या काडतूसांना. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अपमान झाला तेव्हा गौरव यात्रा काढावी असं का वाटलं नाही या भिजलेल्या काडतूसांना. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला गेला. त्याविरोधात गौरव यात्रा काढली नाही या भिजलेल्या काडतूसांनी. म्हणून ही भिजलेली काडतूसं आहेत. यांची काडतूसे उडणारच नाही कधी, अशी टीका त्यांनी केली.

याला सूड घेणं म्हणतात

ज्या दोन महिला मेल्या त्यांच्या घरी जा. त्यांना भेटा. रोशनी शिंदेंना भेटा. तुम्ही गृहमंत्री म्हणताना स्वत:ला. मग जा आणि भेटा. अशा प्रकारच्या कारभाराला राज्य करणं म्हणत नाहीत. हे सूड घेणं म्हणतात. लक्षात ठेवा. तुम्ही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आला नाहीत. ज्या पद्धतीने तुम्ही ठाकरे कुटुंबाबाबत भाषा वापरली ती महाराष्ट्राने लक्षात ठेवली आहे. महाराष्ट्र हे विसरणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला