नवी दिल्ली : महाविकास आघाडीतील (MahaVikas Aghadi) नेते, मंत्री, आमदार, खासदारांवर सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी सुरु आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मेहुण्यावरही ईडीने कारवाई केलीय. त्या पाठोपाठ मंगळवारी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची संपत्तीही जप्त करण्यात आलीय. या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे. खुद्द संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवायला सुरुवात केलीय. महत्वाची बाब म्हणजे बुधवारी संजय राऊत यांनी राज्यसभेतही आक्रमक पवित्रा धारण केला. केंद्र सरकारकडून कायद्याचा दुरुपयोग सुरु असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. मात्र, सभापतींनी संजय राऊत यांना बोलण्यापासून रोखलं. संजय राऊत यांचं बोलणंही रेकॉर्डवर येणार नसल्याचं सभापतींनी स्पष्ट केलं.
संजय राऊत यांची अलिबाग आणि मुंबईतील संपत्ती मंगळवारी जप्त करण्यात आली आहे. अलिबागमधील जमिनीचे आठ तुकडे, दादरमधील एक फ्लॅटचा त्यात समावेश आहे. पत्राचाळ मनी लॉन्ड्रिंग प्रकरणार ही कारवाई करण्यात आलीय. राऊतांवरील ही कारवाई भाजपची मोठी खेळी असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, आपली संपत्ती जप्त करण्यात आल्यानंतर संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेत भाजपवर जोरदार हल्ला चढवायला सुरुवात केलीय.
कोणती प्रॉपर्टी? 2009 साली आमच्या कष्टातून घेतलेली जागा आणि घर आहे ते. याबाबत कधी कुणी आमची चौकशी केली नाही. विचारणा केली नाही. माझी मालमत्ता जप्त केल्याचं आता मी टीव्हीला पाहिलं. एक रुपया जरी मनी लॉन्ड्रिंगचा आमच्या खात्यात आला असेल आणि आम्ही प्रॉपर्टी घेतली असेल तर आम्ही सर्व प्रॉपर्टी भाजपला दान करू, अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी मंगळवारी दिली होती.
त्यानंतर आज राज्यसभेतही संजय राऊत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. संजय राऊतांनी राज्यसभेत बोलताना केंद्र सरकारकडून कायद्याचा दुरुपयोग सुरु असल्याचा आरोप केला. त्यावेळी सभापतींनी राऊतांना बोलण्यापासून रोखलं आणि तुमची वेळ संपल्याचं सांगितलं. तरीही संजय राऊत आक्रमकपणे आपली भूमिका मांडत भाजपवर हल्ला करतच होते. त्यावेळी तुमचं बोलणं रेकॉर्डवर येणार नसल्याचं सभापतींनी त्यांना सांगितलं. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार फौजिया खान यांना बोलण्याची संधी दिली.
इतर बातम्या :