नवी दिल्ली | 27 February 2024 : गेल्या तीन दिवसांपासून देशातील सर्वात मोठ्या न्यूज नेटवर्क TV9 च्या वार्षिक संमेलन व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या माध्यमातून प्रेक्षकांना वैचारिक शिदोरी मिळत आहे. सोमवारी या संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले. काँग्रेसच्या वेळकाढू धोरणांचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी गेल्या दहा वर्षांतील कामगिरी देशासमोर ठेवत, बेस्ट आणि बिगेस्ट हाच मोदी मंत्र असल्याचे सांगितले. त्यांनी मोदीची गॅरंटी काय, याची चुणूक सादोहरण दिली. त्यांच्या चौफेर फटकेबाजीने कालच संमेलनाचा दिवस अक्षरशः गाजवला. त्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, असदुद्दीन ओवेसींसह आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल काय उत्तर देणार?
पंतप्रधानांची चौफेर फटकेबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा 2024 साठी रणशिंग फुंकले. विजयाची हॅटट्रिक करण्याचा मंत्रच त्यांनी सांगितला. बेस्ट आणि बिगेस्ट हाच मोदी मंत्र असल्याचे सांगत बहुमताने तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा हुंकार त्यांनी भरला. आता लालफितशाही आणि वेळकाढूपणाच्या धोरणाला भारताने कधीच मागे टाकले आहे. काँग्रेसच्या चालढकल करण्याच्या धोरणावर त्यांनी हल्लाबोल केला. त्यांनी गेल्या दहा वर्षांतील कामकाजाचा लेखाजोखा जनतेसमोर ठेवला.
आपण पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या औद्योगिक क्रांतीत मागे राहिलो. आपल्याला आता चौथ्या औद्योगिक क्रांतीत जगाचं नेतृत्व करायचं आहे. आज जगाला वाटतंय भारत एक मोठी झेप घ्यायला तयार आहे. तर त्याच्या पाठी दहा वर्षाचा पॉवर फुल लॉन्च पॅड आहे. दहा वर्षात असं काय बदललं. की आज आम्ही इथपर्यंत आलोय. हा बदल माइंडसेटचा आहे, हा बदल सेल्फ कॉन्फिडन्स आणि ट्र्स्टचा आहे. हा बदलाव गुड गव्हर्नेन्सचा आहे. एक जुनी म्हण आहे, मन के हारे हार है, मन के जीते जीत है.” या सोप्या शब्दात त्यांनी दहा वर्षांतील सरकारची यशोगाथा उलगडली.
विरोधकांकडे काय दारुगोळा
- काँग्रेसने संघटनात्मक आणि धोरणात्मक मोठे बदल केले आहे. यापूर्वी दक्षिण उत्तर अशी भारत जोडो यात्रा देशाने पाहिली. त्याला भरभरुन प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता पूर्व-पश्चिम अशी न्याय यात्रा राहुल गांधी करत आहेत. त्यांचे अनेक साथीदार त्यांना सोडून जात आहे. गेली कित्येक दशकं काँग्रेसमध्ये एक संस्थान म्हणून वावरणारी अनेक दिग्गज नेते भाजपकडे जात आहे. न्याय यात्रेत अनेक ठिकाणी अडचणी निर्माण करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेस करत आहे. INDIA आघाडीतून नितीश कुमार बाजूला गेले तर इतर ठिकाणी पण धुसफूस सुरु आहे. तरीही दोन दिवसात आप, समाजवादी पक्षासोबत आणि ममता दिदींसोबत दिलजमाईचे गणित जुळून येत असल्याचे दिसते. महाराष्ट्रातही लोकसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर येईल. पण एकूणच काँग्रेसचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासमोर आव्हाने आहेत. पंतप्रधानांनी काल केलेल्या भाषणात काँग्रेसवर हल्लाबोल केला. त्याला ते काय प्रतिवार करतात. काँग्रेस सत्तेत कमबॅक करणार का, याविषयीची रणनीती ते उलगडतात का, हे लवकरच समोर येईल.
- दिल्लीतील आपचे काँग्रेससोबत मनोमिलन झाल्याची झलक दिसत आहे. दिल्लीनंतर पंजाब हाती आल्याने आपचा आत्मविश्वास दुणावला आहे. पण त्यांच्या अनेक मंत्र्यांमागे ईडी, सीबीआयचा ससेमीरा सुरु आहे. खुद्द, पक्ष प्रमुख अरविंद केजरीवाल यांना नोटीस वर नोटीस मिळत आहे. आता राजधानी दिल्लीतील हा पक्ष काय दमखम दाखवतो. इतर राज्यात किती खाते उघडतो, याचे गणित कदाचित अरविंद केजरीवाल मांडतील.
- ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे नेते सदुद्दीन ओवेसी यांच्या शब्दांना नुकत्याच झालेल्या तेलंगाणा विधानसभेच्या निवडणुकीत चांगलीच धार आलेली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी त्यांची धडपड पण दिसून आली. त्यांच्या खासदारांची संख्या एक अंकावरुन दोन अंकावर जाईल का? मुस्लिमांची काळजी वाहणाऱ्या या पक्षाला सत्तेतील भाजपकडून कोणते आव्हाने आहेत, काय धोके आहेत, हे ओवेसी बिनधास्तपणे मांडतीलच.