मुंबई | अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक भागांना ऐन मार्च महिन्यात गारपीटीनं झोडपून काढलं. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पावसाची विविध रुपं समोर आली आहेत. याच अवकाळीचं आणखी एक स्वरुप समोर आलंय. मध्य प्रदेशातल्या एका ओसाड जंगलात अगदी हिमालयासारखी बर्फवृष्टी झाली. या ओसाड प्रदेशात दूरदूरवर बर्फाची पांढरी स्वच्छ चादरच अंथरल्याचं दृश्य तयार झालं. सोशल मीडियावर हे दृश्य वेगानं व्हायरल होतंय. एवढे दिवस ओसाड राहिलेल्या जंगलात अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावर बर्फ साचल्याचं चित्र दिसल्याने ग्रामस्थांमधून आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
हवामान विभागाने राज्यभरात गारपीट आणि अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता त्यानंतर महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. तसेच महाराष्ट्र लगत असलेल्या मध्यप्रदेशच्या अनेक जिल्ह्यांमध्ये देखील गारपीट झाली आहे.अशातच मध्यप्रदेश मधील खरगोन जिल्ह्यातील काकोडा गावाच्या जंगल परिसरात मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने जंगलाला अक्षरशः हिमालयाचे स्वरूप आले होते गारपिटीमुळे जंगल अक्षरशः बर्फमय झाला होता. ओसाड जमिनीवर गारपीट झाल्याने हिमालयाचे स्वरूप आल्याने गावकऱ्यांनी जंगलात मोठी गर्दी केली होती..
मध्य प्रदेशात खरगोन येथे झालेली बर्फवृष्टी
अवकाळीचा तडाखा विदर्भात अजूनही सुरुच आहे. बुलढाणा जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी प्रचंड गारपिटीने हैदोस माजवला. खामगाव तालुक्यातील हिवरखेड गाव परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.