सध्याचे सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांचा कालावधी नोव्हेंबर महिन्यात संपत आहे. एका वृत्तानुसार, त्यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस केली आहे. ते सध्या दुसऱ्या क्रमांकावरील सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत. न्या. खन्ना हे मे 2025 मध्ये निवृत्त होतील. म्हणजे त्यांना या पदासाठी सहा महिन्यांचा कालावधी मिळेल. त्यांनी 1983 साली वकिलीला सुरुवात केली होती. त्यानंतर देशात लवकरच दुसरा एससी सरन्यायाधीश असेल. राज्यातील वकिलांमधील लोकप्रिय न्यायमूर्तींची सरन्यायाधीशपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
पुढील CJI चे नाव पक्कं
केंद्र सरकारला सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी पत्र लिहिले आहे. त्यांनी न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नावाची उत्तराधिकारी म्हणून शिफारस केली आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड हे 13 मे 2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती झाले होते. तर न्यायमूर्ती खन्ना हे 18 जानेवारी 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयात जज झाले. यापूर्वी त्यांनी हायकोर्ट आणि इतर न्यायाधिकरणावर सेवा दिली आहे.
6 महिने CJI पदावर
NALSA म्हणजे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावर न्यायमूर्तींच्या सेवानिवृत्तीची तारीख समोर येते. त्यानुसार, न्यायमूर्ती खन्ना हे 13 मे 2025 रोजी सेवानिवृत्त होत आहे. नोव्हेंबर महिन्यात त्यांनी सरन्यायाधीश पदाची सूत्र हाती घेतली तर ते या पदावर सहा महिने कार्यरत असतील.
दुसरे एससी न्यायमूर्ती मिळणार
सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यानंतर भूषण रामकृष्ण गवई यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. ते मे 2025 मध्ये या पदाची जबाबदारी सांभाळू शकतात. ते देशातील दुसरे अनुसूचित जातीतील सरन्यायाधीश असतील. यापूर्वी न्यायमूर्ती केजी बालकृष्ण हे देशातील पहिले एससी सरन्यायाधीश होते. ते 11 मे 2010 मध्ये सेवानिवृत्त झाले.
न्यायमूर्ती गवई यांना इतका कालावधी
सरन्यायाधीश पदाची जबाबदारी मिळाल्यावर न्यायमूर्ती बी आर गवई यांना या पदावर 6 महिन्यांचा कालावधी मिळेल. त्यानंतर ते सेवानिवृत्त होतील. सुप्रीम कोर्टाच्या संकेतस्थळानुसार, 16 मार्च 1985 रोजी त्यांनी वकिलीला सुरुवात केली. नागपूर खंडपीठात त्यांनी वकिली केली. न्यायमूर्ती गवई हे 23 नोव्हेंबर 2025 रोजी सेवानिवृत्त होतील. त्यांच्यानंतर या पदावर न्यायमूर्ती सूर्यकांत यांचे नाव चर्चेत आहे.