नवी दिल्ली | 20 जुलै 2023 : पाकिस्तानातून चार मुलांसह आलेली सीमा हैदर आणि नोएडा येथील सचिन मीणा यांची अनोखी लव्ह स्टोरी सध्या देशात हिट झाली आहे. सीमा हैदर नेपाळच्या मार्गाने भारतात आली होती. सचिन सोबत तिने ग्रेटर नोएडाच्या रबुपुरा आंबेडकर नगरात भाड्याच्या घरात दीड महिन्यांपासून तिने मुलांसह मुक्काम टाकला आहे. सचिन तिच्याशी लग्न करण्यासाठी कायदेशीर सल्ला मागायला बुलंदशहरात गेला होता. त्यानंतर बुंलदनगरातील वकीलाने पोलिसांना खबर दिल्याने 4 जुलै रोजी सचिन आणि सीमा हैदरला अटक झाली. त्यानंतर दोघांना जामिन मिळाला आहे. आता तर त्यांना पाहायला घरी येणाऱ्या पाहुण्यांनी गिफ्ट द्यायला देखील सुरुवात केली आहे.
सचिन आणि सीमाची लव्ह स्टोरी सर्व चॅनलवर झळकल्याने सचिनच्या घरी देशविदेशातील मीडीया प्रतिनिधी पोहचले. दोघांना पाहायाला दूरदूरुन लोक येत आहेत. एकदा तर सचिन मुलाखत देता देता बेशुद्ध पडल्याचे त्याचे वडील चेत्रपाल सिंह यांनी म्हटले आहे. पाकिस्तानातून सून आल्याने घरात गर्दी होत आहे. मिडीयाची मंडळींनी घरावर डेरा घातला आहे. आमचे घर छोटे आणि कमजोर असून छत कोसळ्याची शक्यता असल्याचे चेत्रपाल यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांत सीमा आणि सचिनची जोडी पाहायला बिहार, पंजाब, हरियाणा, बिहार आणि दिल्लीतील लोकांनी येऊन त्यांना आर्थिक मदतही केली आहे. पाकिस्तानातून मुलगी सून म्हणून आल्याने सासरे बुवांना अभिमान वाटत आहे. अनेक जण दाम्पत्याला 2001 पासून 5001 रुपयांची मदत करीत आहेत. या मदतीचे प्रमाण वाढतच चालले आहे. कोणी फुलांचा गुच्छ देत आहे.
सचिनच्या घरात एकच पंखा होता. परंतू पाहूण्यांना गरम होत असल्याने लोकांनीच वर्गणी काढून एक कुलर आणि पंखा विकत घेऊन त्यांना भेट दिला आहे. सचिन आणि सीमा यांची वाढती लोकप्रियता पाहून मिडीया ट्रायलदरम्यान काही जण आता दलाली करीत आहेत. त्यांनी सचिनला भेटायला येणाऱ्यांची रजिस्टरवर नोंद केली आहे. सीमा आणि सचिनला भेटण्यासाठी काही जणांकडून दहा हजाराची पेटीएमवर मागविल्याची घटनाही घडली आहे.