उत्तर प्रदेश : पाकिस्तान निवासी असलेल्या सीमा हैदर हिच्यासारखेच आणखी एक प्रेम प्रकरण उजेडात आलं आहे. बांगलादेशातील रहिवासी असलेली महिला मुरादाबाद येथील एका तरुणाच्या प्रेमात पडली. बांगलादेश येथून ती मुरादाबादला आली. हिंदू रिवाजानुसार तिने प्रियकरासोबत लग्न केले आणि काही दिवसांनी ती पुन्हा आपल्या मायदेशी परत गेली. तिने प्रियकराला मला बांगलादेश बॉर्डरपर्यंत सोड. माझा पासपोर्ट आणि व्हिसा वाढवून झाला की पुन्हा परत येईन असे सांगितले. तिचा प्रियकर तिला सोडण्यासाठी बांगलादेशच्या सीमेवर गेला. पण…
मुरादाबाद येथे रहाणारा अजय सैनी या तरुणाशी फेसबुकवर बांगलादेश येथे रहाणाऱ्या ज्युली नावाच्या महिलेशी मैत्री झाली. यानंतर बांगलादेशी ज्युली आपल्या 11 वर्षांची मुलगी हलिमासोबत मुरादाबादला आली. अजयसोबत काही काळ राहिल्यानंतर तिने मुस्लिम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला. एवढेच नाही तर तिने अजयशी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्नही केले.
ज्युलीचा बांगलादेशाचा पासपोर्ट आणि व्हिसा संपणार होता. त्यासाठी तिने अजयला मला बांगलादेश बॉर्डरपर्यंत सोडा. माझा पासपोर्ट आणि व्हिसा याची मुदत वाढवून मी पुन्हा परत येते असे सांगून तिने अजयला सीमेपर्यंत नेले. मात्र, चार पाच दिवसांनी अजय याने आपल्या आईला फोन करून मी चुकून सीमा ओलांडून बांगलादेशात पोहोचलो आहे. पुढील 10, 15 दिवसात मी परत येईल असे सांगितले.
या घटनेला दोन महिने उलटून गेले. त्यानंतर अचानक अजय याची आई सुनीता यांच्या मोबाईलवर रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या अजयचे फोटो आले. घाबरलेल्या सुनीता यांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठून आपल्या मुलाला बांगलादेशातून परत आणण्यासाठी मदत मागितली. तसा रीतसर अर्जही त्यांनी एसएसपींना दिला आहे.
तक्रारदार सुनीता यांनी पोलिसांना सांगितले की, पहिला फोन आल्यानंतर मी अजय परत कधी येणार याची वाट पहात होते. पण, चार पाच दिवसांनी त्याचा पुन्हा फोन आला. त्याने काही पैशांची मागणी केली. लगेच फोन कट झाला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी अजय याचे ते फोटो व्हॉट्सअॅपवर आल्याचे त्यांनी सांगितले.
सुनीता यांनी एसएसपींना लिहिलेल्या पत्रात सुमारे तीन महिन्यांपूर्वी माझा मुलगा अजय याचे बांगलादेशमध्ये राहणाऱ्या जुली नावाच्या महिलेशी फोनद्वारे बोलणे झाले इथपासून ते अजय बांग्लादेशात गेल्यापासूनची सर्व माहिती दिली. तसेच अजयचे फोटो पाहून त्याच्या जीवाचे काही तरी बरेवाईट होण्याची शंका आहे. त्यामुळे ज्युली आणि तिच्या इतर साथीदारांनी माझ्या मुलाचे काहीही वाईट करू नये. कृपया माझ्या मुलाला भारतात परत आणा आणि त्याला मदत करा अशी विनंती केली आहे.