नवी दिल्ली | 4 ऑगस्ट 2023 : एकीकडे आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानातून आपल्या मुलाबाळांसह भारतात आलेल्या सीमा हैदर हीला चित्रपटात संधी आणि निवडणूक लढविण्याची ऑफर आली आहे. तर दुसरीकडे तिची चौकशी आता सशस्र सीमा दलामार्फत सुरु होणार आहे. दुसरीकडे सीमा नेपाळ मार्गे भारतात येताना संबंधित बसेसची तपासणी करणाऱ्या दोन हवालदाराला सशस्र सीमा दलाने निलंबित केले आहे.
सीमा हैदर हीची तीन वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा राहणाऱ्या सचिन मीणा याच्या सोशल मिडीयाद्वारे मैत्री झाली. दोघांची भेट पब्जी खेळताना झाल्याचे म्हटले जात आहे. हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी एकमेकांना भेटायचे ठरविले. सीमा आधी कराचीहून नेपाळला आली. तेथे तिची सचिनशी भेट झाली. तेथे एका हॉटेलात ते राहीले. सीमाने तिचा धर्म बदलला असल्याचा दावा केला आहे. तसेच सचिनशी लग्न केल्याचे म्हटले जात आहे.त्यानंतर दोघे जण नेपाळ सीमेवरुन लपत छपत भारतात आल्याचे म्हटले जात आहे. आणि नोएडा येथे दोघे रहात आहेत.
केंद्रीय एजन्सीने सशस्र सीमा दलाला सीमा हैदर प्रकरणाचा तपास करायला सांगितले आहे. सीमा हैदरने कराचीहून नोएडा पोहचताना नेपाळ सीमेवर कसे काय चौकशीचा ससेमीरा चुकवला आणि भारतात कशी काय पोहचली याचा तपास सशस्र दल करणार आहे. खुनवा चेकपोस्टवर तैनात हेड कॉन्स्टेबल चंद्र कमल कलिता ( 43 ) बटालियन एसएसबी याने बसच्या 35 प्रवाशांची तपासणी केली. त्याने म्हटले की सीट क्र.28 रिकामी आढळली. सीट क्र.37,38,39 चा जेंडर आणि वय 14,13 आणि 8 वर्षे सांगितले जात आहे. परंतू त्या प्रवाशांच्या नावांचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे त्याने बस तपासल्याचा दावा फोल ठरला आहे. 2 ऑगस्टच्या आदेशाने सशस्र सीमा दलाने हेड कॉन्स्टेबलला दोषी ठरवले असल्याचे वृत्त इंडीयन एक्सप्रेसने दिले आहे. सीमेची सुरक्षा करणे आणि भारताच्या क्षेत्रात अनधिकृत प्रवेश रोखण्याच्या आपल्या कर्तव्यात त्यांनी कसूर केल्याचेही या आदेशात म्हटले आहे.
या पूर्वी सीमा हैदर आणि अंजू प्रकरणात भारत सरकारची प्रतिक्रीया समोर आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी म्हटले आहे की सीमा अनधिकृतरित्या भारतात आली आहे. तिच्या बाबत आमची भूमिका यापूर्वीही आम्ही सांगितली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. तपास यंत्रणांना काही नविन माहीती यातून मिळू शकते. दरम्यान, तपास यंत्रणा या प्रकरणाचा तपास करीत आहेत. त्यातून जो काही अहवाल येईल त्यावरुन पुढील कारवाई केली जाईल असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे सीमा हैदर हीला चित्रपटाची ऑफरही आली आहे. या चित्रपटात ती रॉ एजंटची भूमिका साकारणार आहे. तसेच केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी तिला लोकसभा 2024 च्या निवडणूकीचे तिकीट देण्याची तयारी दर्शविली आहे. सीमा हैदर चौकशीतून सहीसलामत सुटून तिला भारतीय नागरिकत्व मिळाल्यासच तिची ही स्वप्ने पूर्ण होतील असे म्हटले जात आहे.