नवी दिल्ली | 10 ऑगस्ट 2023 : मणिपूरच्या हिंसेवरून विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला आहे. त्यावर गेल्या तीन दिवसांपासून लोकसभेत चर्चा सुरू आहे. काल राहुल गांधी आणि स्मृती ईराणी यांची भाषणे झाली. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अविश्वास ठरावावर बोलणार आहेत. त्यानंतर अवाजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यामुळे अविश्वास ठरावात काय होतं याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. मोदी सरकार विरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला असला तरी खरी परीक्षा मात्र अजितदादा गटाची होणार आहे. शरद पवार गटाने सर्व खासदारांना व्हीप बजावलं आहे. त्यामुळे अजितदादा गट हा व्हीप पाळणार की मोडणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागलं आहे.
संसदेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून व्हीप जारी करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैझल यांनी व्हीप जारी केला आहे. हा व्हीप अजितदादा गटाच्या खासदारांनाही लागू आहे. त्यामुळे व्हीपनुसार अजितदादा गट सरकार विरोधात मतदान करणार की व्हीप मोडून मोदी सरकारच्या बाजूने मतदान करणार हे आज दुपारनंतर स्पष्ट होणार आहे.
अजितदादा गटाने अजूनही राष्ट्रवादीत फूट पडलीय असं म्हटलेलं नाहीये. त्यांनी पक्ष सोडल्याचंही म्हटलेलं नाहीये. तर शरद पवार गटानेही राष्ट्रवादीत फूट पडल्याचं उघडपणे म्हटलेलं नाहीये. उलट अजितदादा गटाने शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती कायम ठेवलेली आहे. पक्षात फूट पडलेली नाही. शरद पवार हेच पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे पक्षीय अधिकार अध्यक्षांकडे आहेत. त्यामुळे शरद पवार गटाने बजावलेला व्हीप अजितदादा गटाला मान्य बंधनकारक राहू शकतं. त्यांनी व्हीप पाळला नाही तर त्याची किंमत अजितदादा गटाला मोजावी लागू शकते, असं जाणकारांचं म्हणणं आहे. त्यामुळे अजितदादा गटाची आज परीक्षाच ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, शिंदे गटाने आपल्या खासदारांना व्हीप बजावला आहे. अविश्वास ठरावाच्या मतदानावेळी हजर राहण्याचा व्हीप शिंदे गटाचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे आणि खासदार भावना गवळी यांनी बजावला आहे.
अविश्वास प्रस्तावावर मोदी आज लोकसभेत बोलणार आहेत. दुपारी 4 वाजता मोदी बोलणार आहेत. त्यानंतर सभागृहात अवाजी मतदान होणार आहे. गेल्या दोन दिवसात लोकसभेत अविश्वासावर विरोधी पक्षाचे 10 नेते बोलले. या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी दहा मुद्द्यांवरून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्नही झाला. आज मोदी संसदेत बोलणार आहेत. त्यामुळे मोदी या नेत्यांना काय उत्तर देतात आणि मणिपूरबाबत काय भाष्य करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.