Sharad Pawar : ‘भाजपला हा खेळ महागात पडणार, 2024 च्या निवडणुकीत…’; शरद पवार ॲक्शन मोडमध्ये!

| Updated on: Jul 06, 2023 | 6:58 PM

शरद पवार यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक झाली. अजित पवार गटातील वरिष्ठ नेत्यांवर कारवाई केली आहे. त्यासोबतच या बैठकीनंतर पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांनी 2024 च्या विधानसभा निवडणूकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

Sharad Pawar : भाजपला हा खेळ महागात पडणार, 2024 च्या निवडणुकीत...; शरद पवार ॲक्शन मोडमध्ये!
sharad pawar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली : अजित पवारांनी केलेल्या बंडानंतर शरद पवार अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. शरद पवार यांनी 5 जुलैला घेतलेल्या बैठकीनंतर लगेचच आज 6 जुलैला दिल्लीत बैठक बोलावली. शरद पवार यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक झाली. या बैठकीमध्ये पक्षाच्या विरोधात गेलेल्या अजित पवार गटातील वरिष्ठ नेत्यांवर कारवाई केली आहे. त्यासोबतच या बैठकीनंतर पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांनी 2024 च्या विधानसभा निवडणूकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले शरद पवार?

अजित पवारांनी निवडणूक आयोगाकडे केलेल्या अर्जावर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया देताना निवडणूक आयोगावर माझा विश्वास असल्याचं म्हटलं आहे. निवडणूक आयोगाव्यतिरिक्त सुप्रीम कोर्टात जाण्याचे संकेतही यावेळी शरद पवारांनी दिले. वय 82 असो की 92 त्याच्यानं काही फरक पडत नाही, मी लढायला सक्षम आहे. 2024 ला राज्यातील जनता मविआला सत्ता देतील, भाजपने हा जो काही खेळ खेळला आहे, त्याची किंमत भाजपला चुकवावी लागेल, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

अखेर ‘या’ नेत्यांची हकालपट्टी

या बैठकीत कार्यकारणीने कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, एस. आर. कोहली यांचं पक्षातून निलंबन केलं. यासोबत अजित पवारांसोबत 9 आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. पक्षाला ठेच पोहोचवण्याचं काम काही सहकाऱ्यांनी केल्याचं शरद पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. या कार्यकारणीच्या बैठकीत 8 ठराव मांडण्यात आले. या ठरावात राष्ट्रीय कार्यकारणीचा शरद पवारांवर पूर्ण विश्वास असून शरद पवार हेच राष्ट्रवादीचे मुख्य नेते असल्याचा ठराव करण्यात आला आहे.

शरद पवार अॅक्शन मोडमध्ये

2 जुलैला अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच शरद पवार यांनी या बंडाविरुद्ध झेंडा उभारला. यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ असलेले प्रीतीसंगम, सातारा या ठिकाणाहून शरद पवार यांनी या संर्घषाला सुरुवात केली. शपथविधीला उपस्थित असलेल्या अनेक नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली. ज्या 9 आमदारांनी शपथ घेतली त्यांना पक्षाविरुध्द कारवाई केली म्हणून अपात्र करण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे अर्ज केला आहे.

शरद पवार धडाधड निर्णय घेत आपल्या 60 वर्षांच्या राजकीय अनुभवाचा पुरेपूर वापर करताना दिसत आहेत. तर अजित पवार यांनीही मागे न हटण्याचा निर्धार केल्याच दिसतं. 5 जुलैला एकाच वेळेस झालेल्या दोन बैठकीत काका-पुतण्यांनी आपली राजकीय ताकद दाखवून दिली. अजित पवार यांच्या बैठकीत 32 आमदार तर शरद पवार यांच्या बैठकीत 16 आमदार उपस्थित होते. या दोन्ही बैठकीत नेत्यांनी एकमेकांवर अनेक आरोप-प्रत्यारोप केले.