उत्तरप्रदेश | 16 नोव्हेंबर 2023 : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडलीय. पोटात दुखते म्हणून दहावीत शिकणाऱ्या एका लहान मुलीला तिच्या पालकांनी तिला डॉक्टरांकडे नेले. उपचारापूर्वी पोटात खूप दुखत असल्याचे त्या मुलीने डॉक्टरांना सांगितलं. मात्र, याच दरम्यान तिला जुलाबाचा त्रास होऊ लागला. ती मुलगी शौचालयात गेली. पण, तिथे जे काही झालं त्यामुळे संपूर्ण जिल्हा हादरला.
हाथरस जिल्ह्यातील गेट परिसरातील एका गावातील मुलगी तिच्या आईवडिलांसोबत राहते. इयत्ता 10 वी मध्ये ती मुलगी शिकत आहे. अचानक त्या मुलीची प्रकृती खालावली. त्यामुळे तिच्या पालकांनी तिला जिल्हा रुग्णालयाच्या आपत्कालीन कक्षात नेले. तिच्या पोटात खूप दुखत असल्याचं मुलीने डॉक्टरांना सांगितलं. जुलाबाचा त्रास होतोय असेही ती म्हणाली.
रुग्णालयामधील नर्सने तिला शौचालयात नेले. मात्र काही वेळात लहान नवजात बाळाच्या रडण्याने नर्स दचकली. तिने दरवाजा ढकलला त्यावेळी शौचाला गेलेल्या मुलीने नवजात बाळाला जन्म दिल्याचे तिला दिसले. नर्सने धावपळ केली. त्या मुलीला आणि तिच्या लहान बाळाला बाहेर काढले.
तोपर्यंत ही बातमी रुग्णालयात वेगाने पसरली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने हालचाल करत नवजात मुलगी आणि तिच्या आईला रुग्णालयाच्या महिला वॉर्डात दाखल केले. त्या मुलीने एका मुलीला जन्म दिला हे मुलीच्या पालकांना कळताच त्यांना एकच धक्का बसला.
मात्र, त्यानंतर ती मुलगी आणि तिचे कुटुंबीय त्या नवजात मुलीला सोडून हॉस्पिटलमधून बाहेर पडू लागले. परंतु, रुग्णालय प्रशासनाने त्यांना थांबवले. प्रशासनाने याची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. त्यांनी मुलीकडे अधिक चौकशी केली.
याबाबत महिला वैद्यकीय अधिकारी शैली सिंह यांनी सांगितले की, रुग्णालयाच्या शौचालयात एका अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. त्या अल्पवयीन मुलीचे एका तरुणासोबत शारीरिक संबंध होते. त्यामुळे ती गरोदर राहिली. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. पोलीस त्या तरुणाचा शोध घेत आहेत.