नवी दिल्ली: ईडीकडून निकटवर्तीयांची (ED) होणारी चौकशी आणि भाजप नेत्यांकडून होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू (venkaiah naidu) यांना पत्रं लिहलं आहे. या पत्रात त्यांनी खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत. राज्यातील ठाकरे सरकार पाडण्यासाठी मदत करण्याचा काही लोकांनी मला गळ घातली होती. मध्यावधी निवडणुका घेण्यासाठी ते माझा वापर करणार होते. पण मी त्याला नकार दिला. तेव्हा त्यांनी मला माझी रेल्वे मंत्र्यासारखं तुरुंगात टाकण्याची धमकी देण्यात आली. माझा लालूप्रसाद यादव करण्याची धमकी देण्यता आली, असा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी या पत्रात अनेक दावे केले असून त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंना तीन पानी पत्रं लिहिलं आहे. या पत्रात सर्व गोष्टी मुद्देसूद मांडले आहेत. तसेच हे पत्रं म्हणजे ट्रेलर नाहीये. ट्रेलर अजूनही बाकी आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे. महिन्याभरापूर्वी काही लोक मला, महाराष्ट्रातले सरकार पाडण्यात मदत करा म्हणून भेटले. महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका व्हाव्या यासाठी माझा साधन म्हणून ते वापर करणार होते. असल्या छुप्या अजेंड्यात सहभागी व्हायला मी स्पष्ट नकार दिला. या नकाराबद्दल मोठी किंमत चुकवावी लागेल अशी धमकीही मला देण्यात आली. अनेक वर्षे तुरुंगात घालावे लागलेल्या एका माजी रेल्वेमंत्र्यासारखी तुमची गत करुन टाकू असंही मला धमकावलं गेलं. मीच नाही तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले दोन वरिष्ठ मंत्री आणि दोन वरिष्ठ नेते यांनाही PMLA कायदा लावून तुरुंगात धाडू, त्यामुळं महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागतील आणि सर्व महत्वाचे नेते गजाआड असतील, अशी धमकी मला देण्यात आली होती, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
तीन दशकांपूर्वी मी माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली, तेव्हापासून मी शिवसेनेसोबत आहे. शिवसेना सध्या काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत सत्तेत आहे. शिवसेनेची 25 वर्षांपासून अधिक काळ भाजपासोबत युती होती. या दोघांनी महाराष्ट्रात सरकारही स्थापन केले होते. पण काही वैचारिक भेदांमुळं अलीकडेच युती तुटली. शिवसेना भाजपापासून दूर गेल्यापासून ईडीसारख्या संस्थांनी शिवसेनेचे खासदार व नेत्यांना पद्धतशीरपणे लक्ष्य केले आहे. ईडीचे अधिकारी शिवसेनेचे आमदार, खासदार, नेते यांना छळण्याची एकही संधी सोडत नाहीत. मित्र, नातेवाईक, निकटवर्तीय यांनाही लक्ष्य केले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
स्वतःची राजकीय विचारसरणी असण्याचा आम्हाला हक्क आहे आणि ती केंद्रात सत्ता असलेल्या पक्षाशी मिळतीजुळती असावी असं नाही. याचा अर्थ असा नाही की आमच्या आमदार, खासदार, नेते, कौटुंबिक सदस्य, निकटवर्तीय यांना धमक्या द्याव्या आणि तपासाच्या नावावर त्यांचा छळ करावा, त्यांना मनी लाँडरिंग प्रकरणी अटक करावी. हवालाचा पैसा रोखण्यासाठी आणि त्यामार्गे जमवलेली संपत्ती जप्त करण्यासाठी हा मनी लाँडरिंग कायदा 17 जानेवारी 2003 ला अस्तित्वात आला. तो अस्तित्वात आल्यानंतरच्याच प्रकरणांमध्ये लागू होऊ शकतो. पण अनेक दशकांपूर्वीचे व्यवहार, जे मनी लाँडरिंगशी संबंधितच नाहीत ते तपासले जात आहेत. तपासाच्या नावाखाली राजकीय विरोधकांना छळण्यासाठी, त्यांच्यावर दहशत निर्माण करण्यासाठी ईडी व इतर केंद्रीय तपास संस्थांचा वापर केला जातोय, असा दावाही त्यांनी केला आहे.
संबंधित बातम्या:
VIDEO: ‘मुंबईत शिवसेनाच दादा!,’ संजय राऊतांची डरकाळी; ईडीविरोधात सनसनाटी आरोप