वाराणसी – ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणमध्ये (Gyanvapi masjid survey) तिसऱ्या दिवशी शिवलिंग सापडले आहे. त्यानंतर कोर्टाने जिथे शिवलिंग सापडले ती जागा सील करण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाने (Court) एका याचिकाकर्त्याच्या अर्जानंतर हे आदेश दिले आहेत. ज्ञानवापी परिसराच्या सर्वेक्षणाचा आज तिसरा दिवस आहे. सर्वेक्षणाच्या नंतर हिंदू पक्षकारांच्या बाजूने असलेले डॉ. सोहनलाल यांनी मोठा दावा केला आहे, ते म्हणाले की, आतमध्ये शिवलिंग सापडले आहे. आत्तापर्यंत आत जे शोधण्यात येतं आहे. त्यापेक्षा जास्त सापडण्याची शक्यता आहे. आता पश्चिमच्या भिंतीच्या जवळ 75 फूट उंच, 30 फूट रुंद आणि 15 फूट लांब छिगारा आहे, त्याचा सर्वे करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात पोहचलेल्या मुस्लीम पक्षकारांची सुनावणी (hearing) मंगळवारी होणार आहे. त्यामुळे उद्याच्या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
उद्या सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी
या प्रकरणी सुप्रीम कोर्टात पोहचलेल्या मुस्लीम पक्षकारांची सुनावणी मंगळवारी होणार आहे. वाराणसी कोर्टाने दिलेल्या सर्वेच्या आदेशाला, आव्हान देणारी याचिका अंजुमन इंतजामिया मसाजिद कमिटीने सुप्रीम कोर्टात सादर केली आहे. यावर न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे उद्या सुनावणी होणार आहे. दुसरीकडे सर्वे करुन बाहेर पडलेल्या मुस्लीम पक्षकारांच्या वकिलांनी हिंदू पक्षकारांचा दावा फेटाळून लावला आहे, असे काहीही आत सापडलेले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. या सर्वेने संतुष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. उद्या याबाबत कोर्टात अहवाल सोपवण्यात येणार आहे. एडव्होकेट कमिश्मर यांच्या नेतृत्वात वादी-प्रतिवाद्यांच्या 52 जणांच्या टीमने सकाळी 8 वाजता ज्ञानवापी परिसरात प्रवेश केला केला होता. साधारण 10.30 च्या सुमारास हा सर्वे संपला.
आरपी सिंग यांना सर्व्हे टीममधून काढून टाकले
जेव्हा सर्वेक्षण पथक ज्ञानवापी मशिदीच्या आत जात होते. तेव्हा टीम सदस्य आरपी सिंह यांना थांबवण्यात आले. आज तिसऱ्या दिवशीच्या सर्वेक्षणात त्यांना सहभागी होऊ दिले नाही. आरपी सिंह यांच्यावर माहिती लीक केल्याचा आरोप आहे. सिंग यांच्यावर सर्वेक्षणातील तथ्य बाहेर काढल्याचा आरोप आहे. आज सर्वेक्षण पथक नंदीसमोर बांधलेल्या तलावाच्या विहिरीकडे गेले.
यापूर्वी रविवारी झालेल्या सर्वेक्षणात तळघर व्यतिरिक्त बाजूची भिंत, नमाज स्थळ, वाजू स्थळ या ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आले होते.