नवी दिल्लीः शिवसेनेतील फुटीर गट ज्या बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी 56 वर्षापूर्वी शिवसेनेची कार्यकारिणी (Executive of Shiv Sena) तयार केली ती कार्यकारिणी शिवसेनेचा फुटीर गट कशी काय बरखास्त करु शकतो असा सवाल करुन खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी ज्याप्रमाणे बंडखोर आमदारांनी बंडखोरी करत शिवसेनेला आव्हान दिले त्याप्रणाणे जर शिवसेनेच्या खासदारांनी फुटीर गटाबरोबर बैठका घेतल्या तर त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा शिवसेनेच्या खासदारांनाही देण्यात आला आहे.
दिल्लीत झालेल्या या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, खासदार प्रियंका चतुर्वेदी, विनायक राऊत, ओमराजे निंबाळकर हे खासदार उपस्थित होते.
त्यांनी आणखी काही खासदार आता थोड्याच वेळीत सहभागी होतील असा विश्वासही खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. यावेळी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे बंडखोर आमदारांवर कारवाई होणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. सर्वोच्च न्यायालयाकडू जर कारवाई करण्यात आली तर पहिली कारवाई ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच होईल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
शिवसेनेच्या फुटीर नेत्यांनी जी कार्यकारिणी जाहीर केली आहे, त्याला कोणताही आधार नसून शिवसेनेतील एक फुटीर गट मूळ पक्षाची कार्यकारिणी कशी काय बरखास्त करू शकतो असा सवाल उपस्थित करून त्यांना तो अधिकार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.
विधिमंडळानंतर आता लोकसभेत हा प्रकार चालू झाला असल्याने संजय राऊत यांनी कॉमेडी एक्सप्रेस सिझन टू चालू असल्याचे सागंत त्यांनी एकनाथ शिंदे गटावर जोरदार टीका केली. देशातील न्याय अजून मेला नाही, लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी शिवसेनेच्या फुटीर गटाकडून हा प्रकार सुरू असल्याची टीका संजय राऊत यांन केली.