नवी दिल्ली: हे बेईमान लोकं कधीच कोणत्या पक्षाचे नसतात. ज्यांची कालपर्यंत शिवसेना आई होती, त्यांचे हे लोक झाले नाहीत ते इतरांचे काय होणार? असा सवाल करतानाच पण 2024 साली जेव्हा आमची सत्ता येईल तेव्हा या सर्वांचा हिशोब होईल. 2019 ला हिशोब झाला नाही. तो 2024ला होईल. हे मी ऑन रेकॉर्ड बोलतोय. त्याबद्दल माझ्यावर काय कारवाई करायची ती आता करा, असं आव्हानच ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटाला दिला.
पक्षातून काही लोक बाजूला झाले असतील तर ठिक आहे. त्यांचा निकाल निवडणूक आयोग किंवा सुप्रीम कोर्टात लागेल. कोणत्याही राजकीय पक्षात माणसं येत असतात, जात असतात. काँग्रेस पक्षातून लोक गेले. कधीकाळी भाजपमधून निघून गेले. तरी आज सत्ताधाऱ्यांना धडकी भरवणारी भारत जोडो यात्रा निघाली आहे ना?
पक्ष कधी संपत नसतात. ज्यांची मूळ खोलवर रुजली आहेत ती संपत नसतात. काही स्वार्थी आणि बेईमान लोकं सोडून जातात म्हणजे पक्ष संपला असं होत नाही, असं संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्रात शिवसेना आघाडीची सत्ता येणार. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तेव्हा पाहू. तेव्हा तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतीलच, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.
मी पक्षाचा नेता आहे. माझ्याजवळ जे असतात ते माझ्या जवळचेच असतात. देशातील कार्यकर्ते माझ्या जवळचे आहेत. एकनाथ शिंदे जवळचे होते. दादासाहेब भुसे जवळचे होते. उदय सामंत जवळचे होते. संकटाच्या काळात जे पक्षासोबत असतात ते जवळचे. असे पळपुटे येतात आणि जातात. त्यांची मजबुरी होती. ते काही लोकनेते नव्हते. पक्षाने पदे दिली म्हणून ते मोठे झाले होते. नाही तर ते कोण आहेत? हकालपट्टी करेपर्यंत कोणी त्यांना ओळखतही नव्हते, असा टोलाही त्यांनी लगावला.
तिकडे कर्नाटक सरकार आक्रमक झालं आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री आक्रमक झाले आहेत. अन् आपल्या मुख्यमंत्र्यांना राजकीय पक्षातील लोकांना फोडण्यातच इंटरेस्ट आहे. फोडाफोडी करणं म्हणजे राज्य चालवणं नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.
हे सरकार भ्रष्ट मार्गाने सत्तेवर आलं. हे सरकार भ्रष्टाचाराच्या ओझ्यानेच पडेल. तुरुंगात पाठवलं. केसेस टाकल्या. आमची माणसे फोडली तरी शिवसैनिक मागे हटणार नाही. जे हा खेळ करत आहेत. त्यांचं राज्य औटघटकेचं आहे. त्यांचं राज्य औटघटकेचंच राहील आणि या सर्वांना पश्चात्ताप होईल, असं भाकीतही त्यांनी केलं.
भारत जोडो यात्रेमुळे नफरत विरुद्ध प्रेम हा सामना सुरू झाला आहे. त्याचं भय कोरोनापेक्षा जास्त झालं आहे. म्हणूनच ते भारत जोडो यात्रा रद्द करण्याची मागणी करत आहेत, असा टोला लगावतानाच गुजरातमध्ये शेवटच्या टप्प्यापर्यंत रॅली काढली तेव्हा कोरोना नव्हत का? तेव्हा कोरोनाचं भय नव्हतं का? ट्रम्प आले तेव्हा कोरोनाचा कहर होता. तेव्हा कोरोना नव्हता का? असा सवाल त्यांनी केला.