धक्कादायक, गुजरातच्या मोरबी पूलाच्या अर्ध्या तारा दुर्घटने आधीच तुटलेल्या : एसआयटीच्या अहवालाचा प्राथमिक निष्कर्ष

| Updated on: Feb 20, 2023 | 12:21 PM

गुजरातच्या मोरबी पूल दुर्घटनेचा तपास करणाऱ्या एसआयटीने दिलेल्या प्राथमिक अहवालात या पूलाच्या अर्ध्याहून अधिक तारा घटनेआधीच तुटल्याचे म्हटले आहे.

धक्कादायक, गुजरातच्या मोरबी पूलाच्या अर्ध्या तारा दुर्घटने आधीच तुटलेल्या : एसआयटीच्या अहवालाचा प्राथमिक निष्कर्ष
morbi-bridge
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली : गुजरातच्या मोरबी पूल दुर्घटनेची चौकशी करणाऱ्या एसआयटीने धक्कादायक कबुली दिली आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी गुजरात सरकारने नेमलेल्या एसआयटीच्या टीमने जारी केलेल्या प्राथमिक अहवालात या पुलाच्या तारांना गंज लागणे तसेच जुन्या सस्पेंडर्सना नव्या सोबत जोडून वेल्डींग केल्याने हा पूल कमजोर झाल्याचे आपल्या प्राथमिक अहवालात म्हटले आहे. गुजरातच्या मच्छू नदीवर ब्रिटीशकाळात बांधलेला झुलता पूल गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात तुटल्याने 135 जणांचा मृत्यू झाला होता.

मच्छू नदीवरील या पूलाच्या देखभालीची जबाबदारी अजंता मॅन्यूफॅक्चरींग लिमिटेड (ओरेवा ग्रुप ) या घड्याळ कंपनीला देण्यात आल्याचेही उघडकीस आल्याने गुजरात सरकारवर खूप टीका झाली होती. त्यानंतर या पूल दूर्घटनेचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमण्यात आली. आयएएस अधिकारी राजकुमार बेनीवाल, आयपीएस अधिकारी सुभाष त्रिवेदी, राज्य परिवहन तसेच गृहनिर्माण विभागाचे सचिव तसेच मुख्य अभियंता आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरींचे प्रोफेसर या एसआयटीचे सदस्य होते. मच्छू नदीवरील 1887 मध्ये बांधलेल्या या पूलाचे दोन मुख्य केबलपैकी एक केबलला गंज लागला होता, आणि या पूलाच्या अर्ध्याहून अधिक तारा 30 ऑक्टोबरच्या सायंकाळी घटनेच्या आधीच तुटलेल्या असाव्यात असा निष्कर्ष एसआयटीने काढला आहे.

एसआयटीच्या मते नदीच्या वरील मुख्य केबल प्रवाशांच्या वजनाने तुटली. त्यामुळे हा अपघात घडला. तसेच या पूलाच्या दुरूस्ती दरम्यान जूने सस्पेंडरला ( केबलला प्लॅटफॉर्म डेकशी जोडणारा स्टीलचा भाग ) नव्या सस्पेंडरशी जोडण्यात आले. त्यामुळे सस्पेंडरचे कार्य बिघडले. अशा प्रकारच्या पूलांमध्ये भार वाहन्यासाठी एकल रॉड सस्पेंडरची गरज असल्याचे एसआयटीने म्हटले आहे. मोरबी नगर पालिकेने नियमांचे पालन करता ओरेवा कंपनीला देखभालीचे काम सोपवले होते. मार्च 2022 मध्ये पुलाला दुरुस्तीसाठी बंद केले होते, आणि 26 ऑक्टोबरला कोणत्याही पूर्व चाचणीशिवाय पूलाला सर्वसामान्य जनतेसाठी उघडण्यात आले होते.