नवी दिल्ली : कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनी बाजी मारली. हायकमांडने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. डी. के. शिवकुमार (Shivakumar) यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे असतील. दोन्ही नेत्यांनी सत्ता परिवर्तनासाठी कंबर कसली आणि बदल घडवून आणला. मुख्यमंत्री पदासाठी दोन्ही नेत्यांमध्ये चुरस होती. पण हायकांमडचा निर्णय दोघांनीही मान्य करण्याचे ठरवले होते. खलबतानंतर सिद्धरामय्या यांच्या नाव पुढे आले. पण याबाबतीत शिवकुमार सर्वांच्याच पुढे आहेत. दूर दूरपर्यंत या रेसमध्ये त्यांच्यासमोर कोणीच नाही.
या नेत्यांची कामगिरी
सिद्धरामय्या यांनी वरुणा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. त्यांना 60.9 टक्के मतदान झाले. तर डीके शिवकुमार यांनी कनकपुरा विधानसभा मतदारसंघातून नशीब आजमावले. त्यांनी 75 टक्के मतदान खेचून आणले. सीएम पदी जरी सिद्धरामय्या यांनी बाजी मारली असली तरी संपत्तीच्या बाबतीत डीके शिवकुमारच खरे धनी आहेत. ते गडगंज श्रीमंत आहेत.
किती आहे शिवकुमार यांची संपत्ती
उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानणारे डीके. शिवकुमार यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती दिली आहे. त्यानुसार, त्यांच्यासह कुटुंबाकडे एकूण 1413 कोटी रुपयांची संपत्ती आहे. यापैकी 273 कोटी रुपये जंगम मालमत्ता आहे तर यातील 240 कोटी रुपयांची संपत्ती एकट्या शिवकुमार यांच्या मालकीची आहे. 20 कोटी रुपयांची संपत्ती त्यांच्या पत्नीच्या नावे आहे. तर 1140 कोटींची अचल संपत्ती आहे. 970 कोटींची अचल संपत्ती शिवकुमार यांच्या नावे तर 113 कोटींची संपत्ती पत्नीच्या नावे आहे. डीके शिवकुमार आणि त्यांच्या कुटुंबावर 503 कोटी रुपयांचे भलेमोठं कर्ज पण आहे.
उत्पन्नाचे साधन काय
डीके शिवकुमार यांनी कर्नाटक राज्य मुक्त विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदवी मिळवली आहे. त्यांच्या कमाईचे मोठे साधन शेती आणि व्यवसाय आहे. तर त्यांची पत्नी उषा शिवकुमार या उद्योजिका आहेत. शिवकुमार यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांची नावे ऐश्वर्या, आभरणा आणि आकाश अशी आहेत.
मुख्यमंत्र्यांकडे किती मालमत्ता
सिद्धरामय्या यांच्याकडे एकूण 51 कोटींची मालमत्ता आहे. निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रात त्यांनी याविषयीची माहिती दिली आहे. त्यांची पत्नी पार्वती यांच्या नावावर 21 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर 9 कोटी रुपये सिद्धरामय्या यांच्या नावे तर पत्नीच्या नावे 11 कोटी रुपये आहेत. दोघांच्या नावे 30 कोटी रुपयांची अचल संपत्ती आहे. सिद्धरामय्या यांच्या नावे 9 कोटींची अचल संपत्ती तर पत्नी पार्वतीच्या नावे 20 कोटी रुपयांची अचल संपत्ती आहे. सिद्धरामय्या यांच्या डोई जवळपास 23 कोटी रुपयांचे कर्ज आहे.
सिद्धरामय्या यांना यातून होते कमाई
शारदा विलास विधी महाविद्यालयातून सिद्धरामय्या यांनी विधी शाखेत पदवी मिळवली. सिद्धरामय्या यांनी विविध व्यवसायातून ही कमाई होत असल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे. सिद्धरामय्या आणि पार्वती यांना राकेश आणि यतींद्र ही दोन मुलं आहेत. पण राकेशचं 2016 मध्ये निधन झाले. तर यतींद्र डॉक्टर आहे.