बंगलुरु येथे एका भीषण अपघातात एका कंपनीच्या सीईओसह सहा जणांचा प्राण गेल्याची घटना शनिवारी घडली आहे. या अपघातानंतर भारतातील रस्ते सुरक्षा आणि कार सेफ्टी संदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या अपघातात मृत्यू पावलेले लोक Volvo XC90 या सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या कारमधून प्रवास करीत होते. Volvo कारला जगातील सर्वात सुरक्षित कार मानले जात आहे. या नंतरही कारमधील सहा प्रवासी ठार झाल्याने कारच्या सुरक्षेवरुन सोशल मिडियावर चर्चा सुरु आहे. त्यामुळे रस्ते वाहतूकीला जोपर्यंत शिस्त लागत नाही तोपर्यंत सुरक्षित कार देखील प्रवाशांचे प्राण वाचवू शकत नाही असे म्हटले जात आहे.
हा भीषण वाहन अपघात नेलमंगला-तुमकुर हायवेवर झाला आहे. वोल्वो एक्ससी 90 कारला एका कंटेनर ट्रकने चिरडून टाकले. ट्रक डिवायडरवरून जम्प करुन आला त्याने व्होल्वोला चिरडले. यात व्होल्वो चालकाची कोणतीही चूक नव्हती. या व्होल्वो कारमधून प्रवास करणारे सीईओ चंद्रम येगापगोल (48), त्यांची पत्नी गौराबाई (42), त्यांचा मुलगा ज्ञान (16), मुलगी दीक्षा (12) वहिनी विजयलक्ष्मी (36) आणि विजयलक्ष्मी यांची मुलगी आर्या (6)अशा सहा जणांचा दुर्दैवी मृ्त्यू झाला आहे.चंद्रम येगापागोल हे बंगलुरु येथील ऑटोमोटिव्ह सॉल्यूशन्स फर्म आयएएसटी सॉफ्टवेयर सॉल्यूशन्स कंपनीचे मुख्य संचालक आणि सीईओ होते. त्यांनी दोनच महिन्यांपूर्वी ही कार विकत घेतली होती. पोलिसांच्या माहीतीनुसार या अपघातात चंद्रम येगापागोल सुरक्षितपणे वाहन चालवित होते. त्यांची कोणतीही चूक नव्हती.
या अपघातात कंटेनर ट्रकचा चालक आरिफ जखमी झाला आहे. त्याने मीडियाशी बोलताना सांगितले की,’ माझ्या समोरील कारने अचानक ब्रेक मारला. त्याच्या होणारी धडक टाळण्यासाठी मी देखील अचानक ब्रेक दाबला. परंतू ट्रन न थांबता पुढे गेला. कारला वाचविण्यासाठी डाव्या बाजूला ट्रक वळविला. त्यामुळे ट्रकने डिव्हायडरवरुन उडी मारत दूधाच्या ट्रकला टक्कर मारली. आणि त्याच्या मागे असलेल्या व्होल्वो कारवर तो पलटी झाला. मला माहीत नव्हते की या अपघातात सहा जण ठार झाले आहेत.’