नवी दिल्लीः काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी बुधवारी ऋषी सुनक (PM Rishi Sunak) यांचे ब्रिटनचे नवे पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. त्यांचे अभिनंदन करताना त्या म्हणाल्या की, त्यांच्या कार्यकाळात भारताचे ब्रिटनशी (Britain-India)असलेले संबंध अधिक दृढ होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
भारतीय वंशाचे असलेले ऋषी सुनक यांना लिहिलेल्या पत्रात सोनिया गांधी म्हणाल्या की, ‘तुम्ही ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यामुळे आम्हाला प्रचंड आनंद झाला आहे.
ब्रिटनच्या पंतप्रधानपदी तुमची निवड होणे ही निश्चितच भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी ती अभिमानाची गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
सोनिया गांधी म्हणाल्या, ‘भारत-ब्रिटन संबंध नेहमीच चांगले आहेत. आणि मला खात्री आहे की तुमच्या कार्यकाळातही ते आणखी घट्ट होणार आहे.
ऋषी सुनक पंतप्रधान असताना भारत आणि ब्रिटनमधील संबंध अधिक दृढ आणि घट्ट होतील असा विश्वास व्यक्त करुन त्या म्हणाल्या की त्याचा नक्कीच भारतासाठी फायदा होणार आहे.
त्यामुळे उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल होण्यास मदत होईल अशी आशाही सोनिया गांधी यांनी व्यक्त केली आहे.
ऋषी सुनक यांनी मंगळवारी ब्रिटनचे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी सुनक यांनी अडचणीत असलेल्या देशाच्या गरजा राजकारणापेक्षा वरचेवर ठेवण्याचे आणि पंतप्रधानांनी केलेल्या चुका सुधारण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले आहे.
ऋषी सुनक यांची सोमवारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतेपदीही निवड झाली आहे. 42 वर्षीय असलेले सुनक हे गेल्या 210 वर्षांतील ब्रिटनचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला आहे. ते ब्रिटनचे पहिले हिंदू पंतप्रधान म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जात आहे.