नवी दिल्लीः श्रीलंका संकटाच्या काळात असताना भारताकडून मदत करण्यात आल्याने श्रीलंकेकडून (Sri lanka ) आता आभार मानण्यात आले आहेत. त्याबद्दलच आता श्रीलंकेचे कृषी मंत्री महिंदा अमरावीरा (minister mahinda amaraweera) यांनी भारताला आपला मोठा भाऊ मानत आणि खरा मित्र असल्याचीही भावना त्यांनी व्यक्त केली आहे. संकटाच्या वेळी भारताकडून खूप मोठी मदत झाल्याचे सांगत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास असल्याचेही त्यांनी म्हटेल आहे.
श्रीलंका कृषी संकटात असताना श्रीलंकेला मदत करणारा भारत हा पहिला देश होता. त्यामुळे भारत हा श्रीलंकेसाठी मोठ्या भावासारखा आहे. त्याच बरोबर श्रीलंकेतील कृषी संकटाच्या वेळी देशाला मदत करणाराही भारतच पहिला होता असंही त्यांनी स्पष्ट केले.
भारताकडून श्रीलंकेला मदत करण्यात आल्यानंतर श्रीलंकेतील नागरिकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास असून श्रीलंका लवकरच आर्थिक संकटातूनही बाहेर येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
त्याबरोबरच श्रीलंकेने आता खत आयात करुन अन्नधान्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी रासायनिक खतांवर त्यांनी बंदी घातल्यामुळेच देशात कृषी संकट निर्माण झाले. त्यानंतर ही बंदी उठल्यामुळे आता कृषी क्षेत्रातील परिस्थिती सुधारणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
मागील सरकारने 10 वर्षांत हरित शेतीचे धोरण स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. परकीय चलन वाचवणे हा त्यामागचा उद्देश होता, कारण 400 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स फक्त खतांवर खर्च करण्यात आला होता.
दुसरं कारण म्हणजे श्रीलंकेत शुद्ध आहाराचाही प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे किडणीचे आजार आणि जुनाट आजारांनी डोके वर काढले होते. त्यामुळे शेतीतील रसायनांचा वापर कमी करुन सेंद्रिय शेतीवर जोर देण्याचा प्रयत्न होता असंही त्यांनी सांगितले.
भारताने श्रीलंकेच्या संकटाच्या काळातच प्रचंड मोठी मदत केली होती. त्यामुळे श्रीलंका संकटाच्या काळात तग धरु शकला होता. श्रीलंकेला युरिया पुरविणारा भारत हा जगातील पहिला देश होता हेही आम्हाला विसरुन चालणार नाही अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
त्याबरोबरच भारताकडून मिळालेल्या खतामुळे श्रीलंकेतील पीक उत्पादनात वाढ झाली होती हे मान्य करावे लागेल असं मतही त्यांनी व्यक्त केले.