Video : अविश्वास प्रस्तावादरम्यान श्रीकांत शिंदे आणि अरविंद सावंत भिडले, नारायण राणे यांनी असं काही सुनावलं की..

| Updated on: Aug 08, 2023 | 6:41 PM

लोकसभेतील अविश्वास प्रस्तावादरम्यान महाराष्ट्रातील खासदारांमध्ये तू तू मै मै पाहायला मिळाली. खासदार श्रीकांत शिंदे, अरविंद सावंत आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.

Video : अविश्वास प्रस्तावादरम्यान श्रीकांत शिंदे आणि अरविंद सावंत भिडले, नारायण राणे यांनी असं काही सुनावलं की..
लोकसभेत श्रीकांत शिंदे आणि अरविंद सावंत यांच्यात जोरदार खडाजंगी, नारायण राणे वादात उडी घेत म्हणाले...Watch Video
Follow us on

नवी दिल्ली : लोकसभेत सरकारविरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावादरम्यान दोन्ही बाजूच्या खासदारांनी एकमेकांवर टीकास्त्र सोडलं. यावेळी शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात खडाजंगी पाहायला मिळाली. खासदार श्रीकांत शिंदे यांनी अडीच वर्षाच्या कार्यकाळावर बोचरी टीका केली. तसेच तेव्हा नेमकं काय घडलं याचा पाढा वाचला. ही टीका जिव्हारी लागल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. दोन्ही खासदारांचा वादात मंत्री नारायण राणे यांनीही उडी घेतली आणि अरविंद सावंत यांना शिवसेनाचा इतिहास काय होता? काय झालं आहे? याबाबत सुनावलं.

काय म्हणाले खासदार श्रीकांत शिंद?

“सर्व विकासाच्या कामावर बंदी आणण्याचं काम यांनी केलं. कारण घरच्या बाहेर निघतच नव्हते. म्हणूनच्या त्यांना विकासाची आवश्यकताच नव्हती. गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रात एका वेगळ्याच विक्रमाची नोंद झाली. गेल्या अडीच वर्षात फक्त अडीच दिवस मंत्रालयात जाण्याचा गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड मुख्यमंत्र्यांनी केला होता.”, अशी बोचरी टीका खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटावर केली.

काय म्हणाले खासदार अरविंद सावंत?

“आम्ही भाषण ऐकत होतो. 1953 साली काय झालं? 1973 साली काय झालं? तेव्हा तुझा जन्मही झाला नव्हता. ते आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत. हिंदुत्वात पळपुटे नसतात. पळपुटे काय बोलणार? बाळासाहेब काय होते यांना काय माहिती? खोटारडे लोकं खरं बोलण्याचा प्रयत्न करतात. खोटं बोलून सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. ईडीला घाबरून गेले आता हे लोकं बोलणार हिंदुत्वाबाबत..वॉशिंग मशिन मध्ये गेले आहेत. महाराष्ट्रातील सरकारही घटनाबाह्य आहे. मुख्यमंत्र्यांपासून सर्वच अपात्र होणार आहेत. ” असं खासदार अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिलं.

काय म्हणाले केंद्रीय मंत्री नारायण राणे ?

“अरविंद सावंत यांचं भाषण ऐकताना मला असं वाटत होतं की मी दिल्लीत नाही तर महाराष्ट्र विधानसभेत बसलो आहे. हिंदुत्व आणि खऱ्या शिवसेनेबाबत सांगत आहे. पण हा शिवसेनेत कधी आला. मी 1966 चा शिवसैनिक आहे. मी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा 220 लोकांनी विरोध केला होता. आता काही लोकंच वाचले आहे. हे वाघ नाहीत तर मांजर आहेत. ते संपले आहेत. त्यांची पंतप्रधानांवर बोलण्याची लायकी नाही. “, असं जोरदार प्रत्युत्तर केंद्रीय मंत्री नारायण यांनी विरोधात असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या खासदारांना दिलं.